नव्या कृषी कायद्यातील चुका सांगा – तोमर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नव्या कृषी कायद्यात नेमके काय चुकीचे आहे हे गेल्या २ महिन्यात कुणीच सांगू शकलेले नाही असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे म्हणणे आहे .

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांचे राज्यसभेत जोरदार समर्थन करताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. पाण्याने शेती केली जाते हे संपूर्ण जगाला माहिती आहे, रक्ताने शेती केवळ काँग्रेसच करू शकते, भाजप रक्ताने शेती करू शकत नाही, असे काँग्रेसने अलीकडेच जारी केलेल्या एका पुस्तिकेच्या संदर्भाने तोमर म्हणाले.

शेतकऱ्यांच्या भावना शांत करण्यासाठी सरकारने कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला, याचा अर्थ कायद्यांमध्ये चुका आहेत असा नाही, निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकाही संघटनेने अथवा त्यांच्याबद्दल सहानुभूती असलेले कायद्यातील चुकांकडे अंगुलीनिर्देश करू शकलेले नाहीत, असेही तोमर म्हणाले.

या तीन कायद्यांविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत, असा दावा काँग्रेसने केला त्याचाही तोमर यांनी समाचार घेतला. केवळ एकाच राज्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना चिथविले जात आहे, असे तोमर म्हणाले. कृषी कायदे हा सध्या ज्वलंत प्रश्न असल्याचे तोमर यांनी मान्य केले. विरोधी पक्षांनी यावरून सरकारवर टीका केली असून या कायद्यांना त्यांनी काळे कायदे असेही म्हटले आहे, असे कृषीमंत्री म्हणाले.

कायद्यांमध्ये काळे काय आहे, ते दर्शवून दिल्यास आपण त्यामध्ये सुधारणा करू, असे गेल्या दोन महिन्यांपासून आपण शेतकरी संघटनांना सांगत आहोत, परंतु आपल्याला अद्याप त्याचे उत्तर मिळालेले नाही, त्याचप्रमाणे कायद्यातील कोणत्या तरतुदी शेतकरीविरोधी आहेत तेही विरोधी पक्षांनी दाखविण्याचा प्रयत्न केलेला नाही, असेही तोमर म्हणाले.

सरकारने शेतकऱ्यांना मंडीबाहेरही विक्रीची मुभा दिली आहे आणि त्यावर कोणताही करही लावण्यात येणार नाही. मंडीमध्ये राज्य सरकारकडून जो कर लावण्यात येतो त्याविरुद्ध आंदोलन पुकारले पाहिजे, मात्र अशा प्रकारच्या करांमधून शेतकऱ्यांना मुक्त करणाऱ्या कायद्यांविरोधातच आंदोलन पुकारण्यात येत आहे ही बाब आश्चर्यकारक आहे, असेही तोमर म्हणाले.

Protected Content