मुक्ताईनगर मतदार संघातील दहा मंडलांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील दहा महसूल मंडलांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. यानंतर सततच्या पावसाच्या खंडामुळे महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच सरकार द्वारे पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा निकषात मोठा बदल करून ९५९ महसूल मंडळांचा समावेश दुष्काळात करण्यात आला त्यामुळे दुष्काळी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याचेच फलीत म्हणून मतदार संघातील रावेर , बोदवड व मुक्ताईनगर या तीनही तालुक्यातील १० महसूली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. यात केवळ कुर्‍हा मंडळ सुटलेले असून या महसूली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या महसूल मंडळांचा झाला समावेश

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने खालील महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.

१) खिर्डी बु. ता.रावेर
२) निंभोरा बु. ता.रावेर
३) मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर
४) अंतूर्ली ता.मुक्ताईनगर
५) घोडसगाव ता.मुक्ताईनगर
६) बोदवड ता.बोदवड
७) करंजी ता.बोदवड
८) सावदा ता.रावेर
९) ऐनपुर ता.रावेर
१०) नाडगाव ता.बोदवड

शेतकर्‍यांनी आमदार चंद्रकांत पाटलांचे मानले आभार

गेल्या ३० ते ४० वर्षात अस्मानी व तुफानी सुलतानी संकटे झेलून देखील रावेर तालुक्यातील ऐनपुर महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर होत नव्हती. यंदा आ.चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने पहिल्यांदा नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळ महसूल मंडळांच्या यादीत तसेच शासनाच्या परिपत्रकात ऐनपुर महसूली मंडळाचा समावेश झाला असून आता या महसूली मंडळातील शेतकरी बांधवांना नुकसानी खर्‍या अर्थाने अनुदान व इतर मदतीचे लाभ घेता येणार आहे. यामुळे-

१) जमीन महसुलात सूट
२) सहकारी कर्जांचे पुनर्गठण
३) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती
४) कृषी पंपाच्या चालू वीस बिलात ३३.५% सूट
५) शालेय /महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
६) रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शितलता
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर चा वापर
८) टंचाई जाहीर झालं केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

आदी सुविधा शेतकर्‍यांना मिळणार आहेत. यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

Protected Content