मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस शुभारंभ

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनापासून मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेस शुभारंभ होणार असून त्याद्वारे मतदारसंघातील जनतेचे प्रश्न जाणून घेत त्यावर मंथन करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी नियोजन केले असल्याचे सांगितले.

या निमित्ताने नागरिकांच्या समस्या निवारणासाठी वेगळी यंत्रणादेखील राबविणार असल्याचे ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितले. मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील राऊत जिरा या गावाहून दिनांक १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या यात्रेबद्दल अधिक माहिती देताना ॲड. रोहिणीताई खडसे खेवलकर  म्हणाल्या की, “नाथाभाऊंनी मतदारसंघात गेल्या ३५ वर्षापासून काम केले  आहे. नाथाभाऊंनी गेल्या दीड वर्षांपूर्वी भाजपाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्यासोबत असलेले अनेक वर्षापासूनचे भाजपातील समर्थक व आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरची नवीन टीम अशा कार्यकर्त्यांशी संपर्क, समन्वय साधायचा म्हणून ही जनसंवाद यात्रा सुरू होत आहे.

या दरम्यान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नाथाभाऊंच्या कार्यकाळात मतदारसंघात झालेली कामे आणि काही अपूर्ण प्रकल्प, योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. प्रलंबित कामांच्या संदर्भात नेमक्या काय अडचणी आहेत त्या देखील समजून घेण्यात येणार आहेत. त्या अडचणीत संदर्भात संबंधित विभागाकडे प्रसंगी मंत्रालयस्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.”

चार महिन्यात १८२ गावांचा संपर्क –

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राऊत झिरा ता.बोडवड या गावापासून जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १५ ऑगस्ट ते २६ नोव्हेंबर पर्यंत तब्बल चार महिने सुरू राहणार आहे. या १०५ दिवसात सण उत्सवाचे दिवस वगळता ४७ दिवसांचे संपर्क दौऱ्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यात मुक्ताईनगर बोदवड तालुक्यासह रावेर तालुक्यातील २५ अशा सर्व १२२ गावांमध्ये जनसंवाद यात्रा जाणार आहे. यावेळी शक्य असेल त्या ठिकाणी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील हे देखील सहभागी होणार आहेत.

जनसंवाद यात्रेचा उद्देश –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वधर्मभाव जपणारा पक्ष असून, जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनापासून बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथून राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला सुरुवात करणार असून दि. २६ नोव्हेंबरला मुक्ताई मंदिर कोथळी येथे यात्रेचा समारोप होईल.

ही यात्रा मुक्ताईनगर मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणार असून गावातील ज्येष्ठ सदस्य बंधू भगिनी, युवा व युवती कार्यकर्ते, शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित – आदिवासी सर्व घटकातील बांधवांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला जाईल. त्यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक समस्या जाणून संबंधित समस्या प्रशासनाच्या विभागाकडे सोडवण्यासाठी पाठविल्या जातील. त्याचा पाठपुरावा समिती पक्षामार्फत केला जाईल.

“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण करून “स्वावलंबी गाव ” ही संकल्पना आगामी काळात गावागावात राबविले जाईल. पक्ष संघटन मजबूत करणे त्यासाठी पक्षीय कार्यक्रम आगामी काळात दिले जातील.” असे ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितले.

Protected Content