पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या ₹8 कोटींहून अधिक निधीच्या विविध विकासकामांचा भव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार असून, या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.
पारोळा शहराच्या विकासासाठी आमदार अमोल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून शहरातील रस्ते, प्रकाश व्यवस्था, स्मशानभूमींचे सुशोभीकरण, सार्वजनिक ठिकाणांचा विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. या विकासकामांमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सोहळ्यात सुमारे ₹4 कोटी खर्चून शहरात एलईडी स्ट्रीट लाईट व हायमास्ट दिवे उभारण्याच्या कामाचे लोकार्पण होणार आहे. याशिवाय ₹2.40 कोटी खर्चाच्या अमळनेर रोड काँक्रीटीकरण प्रकल्पालाही प्रारंभ करण्यात येणार आहे. धरणगाव रोड व धुळे रोडलगतच्या स्मशानभूमींच्या सुशोभीकरणासाठी अनुक्रमे ₹1.25 कोटी आणि ₹41 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामांचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे.

याशिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ₹15 लाखांच्या विकासकामाचा शुभारंभ होणार आहे. शहरातील विविध गार्डन, उद्याने, महामार्गालगतच्या जागा आणि मोकळ्या सार्वजनिक परिसरात वृक्षारोपण करून हरित पारोळा घडविण्याच्या उपक्रमालाही या कार्यक्रमातून सुरुवात करण्यात येणार आहे. या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यास लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत बी. पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक विकास सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पारोळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.



