Home Cities भडगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची डॉ. पूनम पाटील यांची उमेदवारी कायम

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची डॉ. पूनम पाटील यांची उमेदवारी कायम

0
15

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भडगाव तालुक्यातील डॉ. पूनम प्रशांत पाटील यांची भाजपकडून महिला प्रतिनिधी मतदारसंघातील उमेदवारी कायम राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी दाखल केलेल्या तीन उमेदवारी अर्जांपैकी दोन अर्ज मागे घेतले असून, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम ठेवल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.

डॉ. पूनम प्रशांत पाटील यांनी भडगाव तालुक्यातील तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये भडगाव तालुका विकासो संस्था मतदारसंघ अर्थात प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मतदारसंघ, इतर सहकारी संस्था मतदारसंघ (ड-३) आणि महिला प्रतिनिधी मतदारसंघाचा समावेश होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तीनपैकी दोन मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतले आहेत. त्यामुळे महिला प्रतिनिधी मतदारसंघातून दाखल केलेला त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. भाजपकडूनही त्यांची उमेदवारी कायम असल्याची माहिती समोर आल्याने भडगाव तालुक्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. डॉ. पूनम पाटील यांच्या उमेदवारीसाठी भाजपचे युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. या प्रक्रियेत त्यांनी राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने महिला प्रतिनिधी मतदारसंघातून डॉ. पूनम पाटील यांची उमेदवारी कायम राहिल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था आहे. त्यामुळे या बँकेच्या निवडणुकीला राजकीय आणि सहकार क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच सहकार क्षेत्रातील इच्छुक उमेदवार या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत महिला प्रतिनिधी मतदारसंघातील लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे. डॉ. पूनम प्रशांत पाटील यांची उमेदवारी कायम राहिल्याची माहिती समोर आल्यानंतर भडगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या उमेदवारीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भडगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व अधिक महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत महिला प्रतिनिधी मतदारसंघातील मतदार कोणाला कौल देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound