जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स ॲप्रिसिएशन अवॉर्ड फॉर बेस्ट सेक्रेटरी – बिग ब्रँच (२०२५-२६)’ हा राज्यस्तरीय पुरस्कार आयएमए जळगाव शाखेचे मानद सचिव डॉ. भरत बोरोले यांना प्रदान करण्यात आला आहे. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथील आयएमए हाऊस येथे आयोजित ६६ व्या वार्षिक राज्य परिषद ‘मॅस्टाकॉन-२०२६’ व ‘आयएमएकॉन-२०२६’ या भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला असून, या यशामुळे राज्यस्तरावर आयएमए जळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन आणि पदग्रहण समारंभास राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार तुषार राठोड, आयएमएचे राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले तसेच माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य पुरस्कार वितरण सोहळ्यात आयएमए महाराष्ट्र राज्याचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले, नवनिर्वाचित राज्याध्यक्षा डॉ. मंजुषा गिरी आणि राज्य सचिव डॉ. रश्मी मेहता यांच्या हस्ते डॉ. भरत बोरोले यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (MMC) नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय कदम, एक्झिक्युटिव्ह मेंबर डॉ. अनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे, राज्याचे मावळते सचिव डॉ. विक्रांत देसाई तसेच कोषाध्यक्ष डॉ. अमोल गिट्टे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रातील भरीव संघटनात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी, डॉक्टरांना एकत्रित आणण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आयएमएच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमधील सक्रिय योगदान यांची दखल घेत डॉ. बोरोले यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या राज्यस्तरीय परिषदेत आयएमए जळगाव शाखेने घवघवीत यश संपादन केले असून, डॉ. बोरोले यांच्यासोबतच जळगाव शाखेतील डॉ. अनिता भोळे, डॉ. लीना पाटील, डॉ. अजिंक्य पाटील आणि डॉ. निरंजन चव्हाण यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या कार्याची दखल घेत आयएमए जळगाव शाखेला ‘बेस्ट इको फ्रेंडली ब्रँच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आल्याने यंदाची परिषद जळगावसाठी विशेष अभिमानाची ठरली.



