Home क्राईम कोथळीत भररस्त्यावर खुलेआम दारू विक्री; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!

कोथळीत भररस्त्यावर खुलेआम दारू विक्री; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!

0
4

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भुसावळ रोडवरील कोथळी गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूर्वी गल्लीबोळांपुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय आता भररस्त्यावर खुलेआम सुरू असल्याचे चित्र समोर येत असून, त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. अवैध दारू विक्रीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावात सार्वजनिक ठिकाणी खुलेआम दारूची विक्री आणि मद्यपान सुरू असल्याने लहान मुले, युवक तसेच महिलांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. गावातील अनेक ठिकाणी दारू विक्रीचे प्रमाण वाढल्याने सामाजिक वातावरण दूषित होत असून, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गावातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, भररस्त्यावर सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले असून, त्यांच्यावर कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गावातील काही नागरिकांनी सांगितले की, अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या मद्यपानामुळे अनेकदा वाद-विवाद आणि अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने गावाच्या कायदा व सुव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी पोलिस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम राबवून गावातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करून गावातील शांतता आणि सुरक्षित वातावरण कायम ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, वारंवार मागणी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. अवैध दारू विक्रीमुक्त कोथळीसाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound