Home क्राईम मोठी बातमी : बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेते संजय गरुड यांना...

मोठी बातमी : बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेते संजय गरुड यांना अटक !

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सर्वत्र गाजत असलेल्या बहुचर्चित बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात विशेष तपास पथकाने शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते संजय गरुड यांना अटक केल्याने प्रचंड खळबळ उडाली असून अजून काही संस्थाचालकांना अटक करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

संजय गरूड यांना नाशिक एसआयटीच्या पथकाने सोलापूरजवळील नातेपुते येथून ताब्यात घेतले आहे. गरुड यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील तब्बल १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आले होते. या बनावट आणि संशयास्पद आयडींच्या आधारे मोठ्या प्रमाणावर शासकीय निधीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संजय गरुड हे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होते. अखेर सोलापूर जवळच्या नातेपुते येथील एका फ्लॅटमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर ही दुसरी सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. गरूड यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर संजय गरूड यांना करण्यात आलेली अटक महत्वपूर्ण मानली जात असून अजून काही मोठे संस्थाचालक आणि शिक्षण अधिकारी एसआयटीच्या रडारवर आहेत.

संजय गरूड हे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणीक क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपली कारकिर्दी काँग्रेसपासून सुरू केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रीय होते. त्यांनी तीन वेळेस जामनेर विधानसभा निवडणूक लढविली होती. ३० जानेवारी २०२४ रोजी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात दाखल झाले होते.


Protected Content

Play sound