Home क्राईम जळगावात बुलेटवरून जाणाऱ्या दोघांकडून १०.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त 

जळगावात बुलेटवरून जाणाऱ्या दोघांकडून १०.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त 

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोपनीय माहितीच्या आधारे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ममुराबाद रोडवरील विटभट्टीजवळ कारवाई करत बुलेट मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन तरुणांकडून एकूण १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मुद्देमालात ७ लाख रुपयांची रोकड, दोन मोबाईल फोन, बुलेट मोटारसायकल आणि इतर साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, अडावद येथील दोन व्यक्ती हवाल्याच्या माध्यमातून रक्कम गोळा करून त्या पैशांतून सोन्याची बिस्किटे खरेदी करतात आणि ती पार्सल करतात. या माहितीची खातरजमा करण्यासाठी शहर वाहतूक शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रवि आणि पोलीस कॉन्स्टेबल मंगळ नथ्थू साळुंखे यांना तपासासाठी पाठविण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.२० वाजता ममुराबाद रोडवरील विटभट्टीजवळ पोलिसांनी एका बुलेट मोटारसायकलला थांबवून तपासणी केली. या दुचाकीवर चालक हरीष राजेंद्र महाजन (वय ३०) आणि मागे बसलेला सुजित गोकुळ महाजन (वय २६), दोघेही रा. बालाजी मंदिराजवळ, अडावद, ता. चोपडा, जि. जळगाव, असे दोन जण आढळून आले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यात १०० आणि ५०० रुपयांच्या चलनी नोटा मोठ्या प्रमाणात मिळून आल्या.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत सुजित गोकुळ महाजन याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बॅगेत १०० रुपयांच्या ५ हजार नोटा, म्हणजेच ५ लाख रुपये, तसेच ५०० रुपयांच्या ५०० नोटा, म्हणजेच २ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण ७ लाख रुपयांची रोकड आढळली. याशिवाय त्याच्याकडील हिरव्या रंगाची अंगठी, अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बुलेट मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ ईयू १८८४) आणि अंदाजे ६५ हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा आयफोनही जप्त करण्यात आला. तसेच हरीष राजेंद्र महाजन याच्याकडून अंदाजे २८ हजार रुपये किमतीचा तांबड्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल आणि २ हजार १२० रुपये रोख रक्कम मिळून आली. या सर्व मुद्देमालाची दोन पंचांसमक्ष तपासणी करून पंचनामा करण्यात आला. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रवि यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहेत.


Protected Content

Play sound