Home Uncategorized वारीत हरवले, प्रशासनाने शोधले; यावलच्या कचरू सावकारेंची कुटुंबाशी सुखद पुनर्भेट

वारीत हरवले, प्रशासनाने शोधले; यावलच्या कचरू सावकारेंची कुटुंबाशी सुखद पुनर्भेट

0
8

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंढरपूर वारीदरम्यान हरवलेल्या यावल येथील वयोवृद्ध कचरू धोंडू सावकारे यांना प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि विविध व्यक्तींच्या समन्वयातून सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यावल आणि पंढरपूर प्रशासन, पोलिस यंत्रणा तसेच स्थानिक नागरिकांच्या वेळीच केलेल्या सहकार्यामुळे ही पुनर्भेट शक्य झाली असून या कार्याबद्दल कुटुंबीयांनी सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील कचरू धोंडू सावकारे हे पत्नीसह पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. मात्र गर्दीदरम्यान ते हरवले. त्यानंतर ते पंढरपूरजवळील आज्योती या गावात राजेंद्र अरकिले यांच्या घरी पोहोचले. ते यावलचे रहिवासी असल्याचे समजल्यानंतर राजेंद्र अरकिले यांनी गुगलच्या माध्यमातून यावल तहसील कार्यालयाचा संपर्क क्रमांक मिळवून तहसीलदारांना याबाबत माहिती दिली.

यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी माहितीची खातरजमा केल्यानंतर तातडीने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पाटील अशोक पाटील यांनी तत्काळ आज्योती गावात जाऊन कचरू सावकारे यांना सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना गोपाळपूर, पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या मठात हलविण्यात आले.

कचरू सावकारे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले. याबाबतची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनाही देण्यात आली. मानसिक अस्वस्थतेमुळे सावकारे यांना सांभाळताना काही अडचणी आल्या, मात्र संबंधितांनी संयमाने परिस्थिती हाताळली.

दरम्यान, प्रशासनाने सावकारे यांचे सुपुत्र कैलास कचरू सावकारे यांच्याशी संपर्क साधून त्यांना तातडीने पंढरपूरला जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कैलास सावकारे यांनी पंढरपूर गाठून श्री संत तुकाराम महाराज मठात पोलीस पाटील अशोक पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या वडिलांचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस प्रशासन, श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन विजयकुमार पाटील तसेच मदतीसाठी पुढे सरसावलेल्या सर्व व्यक्तींचे मनःपूर्वक आभार मानले.

या संपूर्ण घटनाक्रमात महामंडलेश्वर ह.भ.प. भगवान दासजी महाराज, रघुनाथ पाटील, एकनाथ महाराज (धरणगाव), माजी सरपंच सुरेखा पाटील, दत्तात्रेय गोवर्धन, प्रशांत गोवर्धन, सानिका गोवर्धन, सखुबाई गोवर्धन, सुभाष चौधरी (चिंचोली), नामदेव तायडे (कानडदा), गोकुळ सावंत, आशाबाई सावंत (चमगाव), सुनंदाबाई कोळी (पाळधी), कल्पना पाटील (बांभोरी) तसेच वारीसाठी आलेल्या अनेक भाविकांनी मोलाचे सहकार्य केले.


Protected Content

Play sound