जीडीपी वाढ १३.७ टक्क्यांनी होण्याचा मुडीजचा अंदाज

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मुडीज या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने गुरुवारी १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज १०.८ टक्क्यांपासून वाढवून १३.७ टक्क्यांपर्यंत केला आहे.

 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशावर निर्माण झालेले आर्थिक मंदीचे सावट हळूहळू दूर होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे पुन्हा सुरू झाल्याने देशाचा आर्थिक गाडा पूर्वपदावर येत आहे. कोविड -१९ साठीच्या लसीकरणामुळे बाजारात आत्मविश्वास वाढतो आहे.

 

चालू आर्थिक वर्षासाठी यूएस-आधारित मुडीज या रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की, अर्थव्यवस्था ७ टक्क्यांपर्यंत घसरेल, जी आधीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. या आधी मुडीजने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये १०.६ टक्क्यांपर्यंत घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला होता.

 

मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे असोसिएट मॅनेजिंग डायरेक्टर   जीन फांग म्हणाले की, “आमचा सध्याचा अंदाज असा आहे की दैनंदिन सामान्यीकरणाच्या प्रभावामुळे मार्च २०२१ रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ७ टक्के घसरेल आणि पुढील आर्थिक वर्षात १३.७ टक्के वाढीची अपेक्षा आहे.”

 

मुडीज आणि आयसीआरए यांच्या वतीने आयोजित “इंडिया क्रेडिट आउटलुक २०२१” या विषयावरील ऑनलाईन परिषदेत फॅंग यांनी सांगितले की, लसीकरणामुळे बाजारपेठा सामान्य स्थितीत परत येण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

Protected Content