केशवस्मृती प्रतिष्ठान हा माणुसकीचा झरा : ना. गुलाबराव पाटील

avinashi puraskar

जळगाव प्रतिनिधी । डॉ.अविनाश आचार्य यांनी स्थापन केलेली केशवस्मृती ही संस्था नसून तो एक माणुसकीचा झरा आहे, असे गौरवोदगार राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी येथे काढले.

येथील केशवस्मृती सेवासंस्था समूह आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वा डॉ. आचार्य ङ्गअविनाशी सेवाफ पुरस्कार वितरण सोहळा रविवारी सायंकाळी ५ वा. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात मोठ्या थाटात आणि श्रोत्यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात संस्थांतर्गत गटातून मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील लेपा या आदिवासी क्षेत्रात कार्य करणार्‍या नर्मदा संस्थेस तर व्यक्तिगत स्तरावर पुण्यातील ङ्गडॉक्टर फॉर बेगर्सफ असा लौकिक असलेले भिक्षेकर्‍यांचे डॉक्टर डॉ. अभिजीत सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रु १,०१,००० आणि रु. ५१००० तसेच मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर आणि राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील होते. त्यांच्यासह केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव, उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी ना.पाटील म्हणाले की, प्रतिष्ठानने डॉ.अभिजीत सोनवणे यांच्यासारखा भिकार्‍यांचा डॉक्टर पुरस्कारासाठी शोधून त्यांचा सन्मान करणे हा जळगावचाही गौरव आहे. डॉ. मनिषा सोनवणे त्याचप्रमाणे भारती ठाकूर यांचे जळगावशी नातेच त्यांना सेवाकार्यात घेवून आले, असेही ते म्हणाले. यावेळी संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणार्‍या मान्यवरांपैकी प्रातिनिधीक स्वरुपात डॉ. सुदर्शन नवाल, उद्योगपती व समाजसेवी रतनलाल बाफना, उद्योजक वासुदेव महाजन, डॉ. राजेश डाबी, सामाजिक कार्यकत्या सुमित्रा राव व डॉ.चंद्रशेखर पाटील तसेस यादव परिवारातील सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात अनिल राव यांनी केशवस्मृती सेवासंस्था समुहाच्या लहानमोठ्या सुमारे २७ प्रकल्पांची माहिती देत, डॉ. आचार्य ङ्गअविनाशी सेवाफ पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. प्रमुख वक्ते डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने ठरविले तर तो आयुष्यात किती मोठी कामे करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणून आपण डॉ. सोनवणे दाम्पत्य आणि भारतीताई ठाकूर यांच्याकडे पाहू शकतो. डॉ. सोनवणे यांनी केलेल्या जगावेगळ्या कामांची आपण कल्पनाही करू शकत नाही. अशा निरपेक्ष भावनेने काम करणार्यांचा शोध घेवून त्यांना पुरस्कृत करणारी केशवस्मृती सेवासंस्था समूहही अभिनंदनास पात्र आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

सत्काराला उत्तर देतांना भारती ठाकूर नर्मदेच्या परिक्रमेसाठी गेले असता घेतलेला अनुभव, आलेले आजारपण, परिसरातील वैद्यकीय सुविधा आणि शिक्षणाचा अभाव यातून या परिसरासाठी काम करण्यासाठी मिळालेली प्रेरणा ही जणू नर्मदेचीच हाक होती, असे भावपूर्ण उद्गार नर्मदालय संस्थेच्या संस्थापिका आणि संस्थास्तरावरील पुरस्कार विजेत्या भारती ठाकूर यांनी काढले. समाजात सेवाकार्याचा एवढा विशाल वटवृक्ष उभा करणारे डॉ.आचार्य यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने कृतार्थतेची भावना मनात असल्याचे सांगून त्या म्हणाल्या. तर, माझे छोटेसेच काम असले तरी ते अविनाशी आहे. कारण समाजाने नाकारलेल्या व्यक्ती म्हणजे भिक्षेकरी. त्यांच्यासाठी काम करताना हे काम कधीही संपणारे नसल्याने कदाचित मला हा पुरस्कार देण्यात आला असावा, अशी भावना ङ्गडॉक्टर फॉर बेगर्सफ अशी ओळख असलेल्या डॉ.अभिजीत सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केली. सूत्रसंचालन संगीता अट्रावलकर आणि संदीप लाड यांनी केले. रत्नाकर पाटील यांनी आभार मानले.

Protected Content