‘मेंदूत द्वेष भरलेला इतिहास सत्य नसतो’ : प्रा.डॉ.सबनीस यांचे परखड मत

अस्मितादर्शकार, पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे स्मृती अभिवादनानिमित्त व्याख्यान संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे अस्मितादर्शकार पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या स्मृती अभिवादनानिमित्त प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी ‘जे घडले नाही, ते इतिहासाच्या नावाने खपवीत असाल, तर ते योग्य नाही. अये म्हणत मेंदूत द्वेष भरलेला इतिहास सत्य नसतो’ असे परखड मत प्रा.डॉ.सबनीस यांनी व्यक्त केले.

रविवारी, 27 मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील कला, वाणिज्य आणि गृहविज्ञान महाविद्यालयात (एसएनडीटी) येथे कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला अस्मितादर्शकार डॉ.गंगाधर पानतावणे यांना अभिवादन करण्यात आले. विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेच्या प्रभाग समितीचे सभापती प्रा. डॉ. सचिन पाटील, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल, सामाजिक कार्यकर्ते फईम पटेल, एरंडोल येथील अ‍ॅड.मोहन शुक्ला उपस्थित होते.

या कार्यक्रमात, प्रा.डॉ.सबनीस यांनी ‘छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण – ब्राह्मणेतर वाद, विवेकवादी भूमिका या आपल्या पुस्तकासंदर्भात भूमिका मांडली. त्यांनी “छत्रपती शिवरायांचे विरोधक कोण? दादोजी कोंडदेव आणि संत रामदास गुरू होते की शत्रूंचे हेर? महाराजांनी मागास स्त्रीशी लग्न केले होते का? शिवाजी महाराजांना खरंच विषप्रयोग केला होता का? संभाजीराजांना औरंगजेबास कुणी पकडून दिले?” या सर्व ज्वलंत प्रश्नांची विवेकवादी भूमिकेतून मांडणी केली.

 “जे घडले नाही, ते इतिहासाच्या नावाने खपवीत असाल, तर ते योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारण धर्मातीत आहे. मेंदूत द्वेष भरलेला इतिहास सत्य नसतो. दोन्हीकडे विकृती आहे. या विकृतीतून समाजाची सुटका करावयाची आहे. सत्याची निष्ठा जपावी लागेल” असे परखड मत पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे अध्यक्षस्थानी होते. प्रा.डॉ.सबनीस म्हणाले की, “शिवरायांच्या स्वराज्याला जात-धर्म नाही. प्रत्येक इस्लामचा माणूस शिवाजी महाराजांच्या विरोधात नव्हता. अनेक जातींची गुणवान माणसे स्वराज्यात होती. महाराष्ट्र शांत करायचा असेल तर इतिहासातील जातीची भांडणे थांबविली पाहिजेत. शिवाजी महाराजांचे विचार जातीयवादांना कलम करणारा आहे.आता विवेकवादाची भूमिका घेणार्‍यांची बेरीज मला करावयाची आहे. महाराष्ट्राचे भवितव्य भेसूर आहे. गळ्यात गळा घाला. माणसाचे हित आता जोपासावे.”

प्रमुख अतिथींचे स्वागत राजेंद्र पारे व विजय लुल्हे यांनी केले. डॉ.मिलिंद बागूल यांनी प्रास्ताविक केले. बापू पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. कलाशिक्षक एन.डी.सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. सतीश जाधव, चारुदत्त गोखले, प्रा.डॉ.प्र.ज.जोशी, अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे, दिलीप सपकाळे, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, भारतरत्न डाँ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे  संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, इंदिरा जाधव, प्रा.डॉ.लभाणे, महेंद्र पाटील, प्रा.डॉ.वळवी, संजय ठाकूर, महेंद्र केदार, निलूबाई इंगळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अमळनेर येथील प्रा.डॉ.प्र.ज.जोशी लिखित ‘मराठीचा भाषिक अभ्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा.डॉ.सबनीस, डॉ.बागूल, अ‍ॅड.शुक्ला, प्राचार्य सचिन पाटील, फहिम पटेल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला शहरासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!