जळगावच्या लेखपालाचा मृतदेह आढळला जायकवाडी जलाशयात

dead body on track

जळगाव प्रतिनिधी । शहरातील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अकाऊंटंन्ट म्हणून कार्यरत हेमंत प्रभू सोनार वय 40 रा. आशाबाबा नगर रोड जळगाव, हे बेपत्ता झाल्याची घटना प्रजासत्ताकदिली सायंकाळी उशीरा समोर आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. या बेपत्ता हेमंत सोनार या कर्मचार्‍याचा सोमवारी सकाळी पैठण येथील जायकवाडी धरणाजवळ मृतदेह आढळून आला. कार्यालयीन कामकाजामुळे ते काही दिवसांपूर्वी ते तणावात होते, यातून ते बेपत्ता होवून त्यांनी जायकवाडी येथील धरणात आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र सोनार बेपत्ता झाल्यावर जायकवाडी धरणावरच येथेच का केले, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे.

रामानंदनगर परिसरात आशाबाबा नगर रोड परिसरात हेंमत सोनार हे पत्नी स्वाती, मुले भावेश व अक्षता या कुटुंबासह वास्तव्यास आहे. ते मूळ धुळे येथील रहिवासी आहेत. सहा महिन्यांपूर्वीच ते पदोन्नतीवर जळगाव येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात रुजू झाले व आशाबाबा नगर रोडवरील पारिजात अपार्टमेंट ब्लॉक नं 57 येथे राहत होते. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता हेमंत सोनार हे पत्नीला मी बाहेरुन फिरुन येतो, असे सांगून निघाले. यानंतर रात्री उशीरा परत आले नाही. पत्नी मुलांसह रिक्षातून त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते मिळून न आल्याने नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांसह पत्नी स्वाती यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. रात्री 10.37 वाजेच्या सुमारास पती हेमंत सोनार हे बेपत्ता असल्याची माहिती दिली.

सोनार राहत असलेल्या परिसरातील काही तरुण सोमवारीही त्यांचा शोध घेत होते. मात्र ते मिळून आले नाही. अचानक दुपारी 2 वाजेच्या सुमारास पैठण येथील पोलिसांचा फोन सोनार यांच्या पत्नीच्या मोबाईलवर आला. पोलिसांनी वर्णन सांगत, वर्णनाचे इसम याठिकाणी असून त्यांचे फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवित आहे. ओळख पटवून ते तुमचे बेपत्ता असलेले पती आहेत काय? याबाबत सांगितले. त्यानुसार काही वेळात व्हॉटस्अ‍ॅपवर आलेल्या फोटोनुसार जायकवाडी धरणावर आढळून आलेला मृतदेह हेमंत सोनार यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पत्नीसह मुलांनी हंबरडा फोडत एकच आक्रोश केला. माहितीनुसार नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी पैठणकडे रवाना झाले.

Protected Content