जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील : सीईओ मीनल करनवाल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिक्षक हा समाज परिवर्तनाचा प्रमुख स्तंभ असून त्यांच्या अडचणींचे निराकरण हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे, असे स्पष्ट करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे सकारात्मकपणे दखल घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत मंगळवार, दिनांक १५ एप्रिल रोजी साने गुरुजी सभागृहात एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यामध्ये शिक्षणाधिकारी विकास पाटील, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या बैठकीत आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खासगी शाळांतील शिक्षकांच्या समस्या मांडल्या. यामध्ये पदोन्नती प्रक्रिया, सेवा जेष्ठता यादी, निवडणूक ड्युटीवरील नियोजन, अपंग शिक्षकांचे प्रश्न, अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षकांना अडकवले जाणे इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता.

महत्वाचे निर्णय व सूचना:

शाळा स्तरावरून मागवली जाणारी माहिती आठवड्यातून एकदाच – शनिवार या दिवशीच मागवण्याचे आदेश.
माहिती ई-मेलच्या माध्यमातून सादर करावी व त्यासाठी अधिकृत ई-मेल आयडीचा वापर अनिवार्य.
सेवा पुस्तके अपडेट करण्यासाठी गट स्तरावर विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येणार.
शिक्षकांनी आपले सेवा पुस्तके स्कॅन करून स्वतःकडे साठवून ठेवावीत.
अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांची मुक्तता व्हावी यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवून पाठपुरावा करण्यात येईल.

मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी शिक्षक प्रतिनिधींना विश्वास दिला की, शिक्षकांचा आदर राखत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध आहे. शिक्षकांच्या कार्यक्षेत्रात अडथळा ठरणारे मुद्दे दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येतील. ही बैठक शिक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासन संवेदनशील आहे हे अधोरेखित करणारी ठरली.

Protected Content