Home उद्योग जळगावात ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ विषमुक्त धान्य महोत्सवाचा भव्य प्रारंभ 

जळगावात ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ विषमुक्त धान्य महोत्सवाचा भव्य प्रारंभ 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बदलत्या जीवनशैलीत आरोग्याबाबतची जागरूकता झपाट्याने वाढत असताना, विषमुक्त आणि नैसर्गिक अन्नपदार्थांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावात आयोजित ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ विषमुक्त धान्य महोत्सवाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असून नागरिकांकडून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

श्री श्री ॲग्री ट्रस्ट, बेंगलोर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन जळगावच्या महापौर दीपमालाताई काळे यांच्या हस्ते पार पडले. शासकीय आयटीआय मागे, शिक्षक वाडी येथील श्री श्री ज्ञान केंद्र (आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्र) येथे हा महोत्सव भरवण्यात आला आहे. उद्घाटनावेळी बोलताना महापौर काळे यांनी केमिकलमुक्त शेतीमाल ही काळाची गरज असल्याचे सांगत, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शुद्ध माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ ही संकल्पना असून, यामुळे ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय ताजा आणि गुणवत्तापूर्ण शेतीमाल उपलब्ध होत आहे. प्रदर्शनात नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला ताजा भाजीपाला, विविध कडधान्ये, डाळी, केमिकलविरहित गूळ, लाकडी घाण्याचे आरोग्यदायी तेल तसेच घरगुती पद्धतीने तयार केलेल्या कुरडया यांसारख्या अनेक वस्तूंचे स्टॉल्स आकर्षण ठरत आहेत. या विविधतेमुळे नागरिकांना आरोग्यदायी पर्यायांची थेट खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

दरम्यान, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनीही या प्रदर्शनाला सदिच्छा भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली आणि अशा उपक्रमांमुळे शेतकरी व ग्राहक यांच्यातील थेट संबंध अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले. या प्रसंगी माजी कृषी अधीक्षक अनिल भोकरे, डॉ. गिरीश बोरसे, डॉ. रंजना बोरसे, डॉ. अनिल खडके, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले, सचिव डॉ. पंकज शहा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नितीन महाजन यांनी केले.

हा विषमुक्त धान्य महोत्सव २४ ते २६ एप्रिल दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी या नैसर्गिक शेतीमाल प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound