Home Uncategorized कुंभमेळा कारभारावर ‘भिंग’! कथित बनावट वर्क ऑर्डरविरोधात शिवसेना-मनसेचे अनोखे आंदोलन

कुंभमेळा कारभारावर ‘भिंग’! कथित बनावट वर्क ऑर्डरविरोधात शिवसेना-मनसेचे अनोखे आंदोलन

0
12

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाशिक सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाशी संबंधित कथित बनावट वर्क ऑर्डर आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून जळगावमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात साबण व सॅनिटायझर घेऊन कथित भ्रष्टाचार ‘स्वच्छ’ करण्याचा प्रतीकात्मक संदेश दिला. तसेच भिंगाचा वापर करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनातील कारभार पारदर्शकपणे तपासण्याची मागणी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनातून नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामांमध्ये बनावट वर्क ऑर्डर तयार करून प्रशासकीय तसेच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.

या कथित प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. संबंधित प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

सदर खाते किंवा विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या अखत्यारीत येत असल्याचा दावा करत, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यामध्ये किंवा त्यासंदर्भातील गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

शासनाने या कथित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी, वर्क ऑर्डर प्रक्रियेची चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आणि सार्वजनिक महत्त्वाच्या आयोजनातील कामकाज पारदर्शक असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोदभाऊ घुगे, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, शिवसेना महिला महानगरप्रमुख मनिषाताई पाटील, विनायक धर्माधिकारी, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, प्रभाकर कोळी, अशोक पाटील, प्रेमराज राठोड, किरण ठाकूर, महेश अहिरे, स्वप्निल राजपूत, किशोर धनगर, योगेश पाटील यांच्यासह मनसेचे सुनील सोनवणे, सागर जाधव, शैलेश चौधरी, तेजस कोळी, श्रीराम पाटील, चेतन पाटील, संकेत जाधव, गोपाल भारुडे, भरत पाटील, प्रशांत बाविस्कर, गणेश कुंभार, हेमंत कोळी, कुणाल पाटील, किरण सपकाळे, अनिल राठोड, बापू मेने, लखन पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound