Home आरोग्य महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू; आता अनेक उपचार मोफत

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू; आता अनेक उपचार मोफत


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील सुपर स्पेशॅलिटी सुविधा असलेल्या महादेव हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली असून गरजू रुग्णांसाठी मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून जिल्ह्यातील आरोग्य सेवेला नवे बळ मिळाले आहे.

शहरातील २४ तास वैद्यकीय सेवा देणारे सुसज्ज रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने विविध गंभीर व सर्वसाधारण आजारांवर उपचार केले जातात. आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या योजनेअंतर्गत स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी तसेच अतिदक्षता विभागात विविध गंभीर आजारांवर उपचार उपलब्ध होणार आहेत. हृदयविकार, मेंदू व न्यूरो आजार, हाडांचे फ्रॅक्चर व सर्जरी, किडनी, स्टोन व डायलिसिस, कॅन्सर, बालरोग, महिला आजार, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, हर्निया, अपेंडिक्स अशा अनेक आजारांवरील उपचारांचा यात समावेश आहे.

रुग्णांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शासनाच्या या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मोफत उपलब्ध होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.

महादेव हॉस्पिटलमध्ये ही योजना सुरू झाल्याने जळगाव जिल्ह्यासह परिसरातील रुग्णांना मोठा फायदा होणार असून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक अडचणी अडसर ठरणार नाहीत, अशी भावना व्यक्त केली जात आहे. आरोग्य सेवेत सर्वसामान्यांसाठी हे एक महत्त्वाचे सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

महादेव हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाला दर्जेदार व तत्पर उपचार देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे योजनेअंतर्गत भरती झालेल्या रुग्णांसाठी एक सीटी स्कॅन किंवा एमआरआय मोफत करण्याचा निर्णयही रुग्णालयाने घेतला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना निदान प्रक्रियेतही मोठा दिलासा मिळणार आहे.


Protected Content

Play sound