Home Cities जळगाव स्वच्छ व हरित जळगावासाठी १२ ते १६ ऑगस्टदरम्यान भव्य पर्यावरण महोत्सव ;...

स्वच्छ व हरित जळगावासाठी १२ ते १६ ऑगस्टदरम्यान भव्य पर्यावरण महोत्सव ; महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन

0
15

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराला स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने जळगाव शहर महानगरपालिका, नाशिक येथील ‘हिरवांकुर संस्था’ आणि जळगावच्या ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पाच दिवसीय पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध पर्यावरणपूरक उपक्रम, जनजागृती मोहीम, प्रदर्शन आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार असून, या महोत्सवाची माहिती गुरुवारी महापौर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेत महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, हा महोत्सव केवळ प्रदर्शनापुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाची व्यापक लोकचळवळ आहे. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असून या मोहिमेत प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. जळगावकरांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या पाच दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नूतन मराठा महाविद्यालय येथे होणार आहे. उद्घाटनापूर्वी शहरातून भव्य सायकल रॅली आणि वृक्षदिंडी काढून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जाणार आहे. त्यानंतर १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण विषयक प्रदर्शन भरविण्यात येणार असून ते सर्व नागरिक, महिला, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

महापौर दीपमाला काळे यांनी इंदूर शहराचा आदर्श समोर ठेवत जळगावलाही स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात आणि देशात वेगळी ओळख निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. “इंदूर शहराची ओळख देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आहे. त्याच धर्तीवर जळगावही स्वच्छ आणि सुंदर बनवायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापासून परिसरापर्यंत स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्या म्हणाल्या.

या पत्रकार परिषदेला नाशिक येथील हिरवांकुर फाउंडेशनचे प्रमुख निलयबाबू जैन शाह, जळगाव ग्रीन सिटीचे संचालक विजयकुमार वाणी, नलिनी शाह, कांचन वाणी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. महोत्सवादरम्यान विविध पर्यावरणपूरक संकल्पना, वृक्षसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि शाश्वत विकास याविषयी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Protected Content

Play sound