धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहराच्या दीर्घकालीन स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाला अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत राज्य शासनाने वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापन प्रकल्पांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर धरणगाव नगरपरिषदेच्या प्रस्तावित सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जळगावचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.
राज्याच्या नगर विकास विभागाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी सविस्तर कार्यपद्धती जाहीर केली आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये मलजल प्रक्रिया केंद्रे (STP), मलजल वाहिनी जाळे (Sewer Network), तसेच Interception & Diversion प्रकल्पांच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंतची स्पष्ट प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), तांत्रिक मान्यता, गुणवत्ता नियंत्रण, संचालन आणि देखभाल यासाठीही निश्चित निकष ठरविण्यात आले आहेत.

धरणगाव नगरपरिषदेने सादर केलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, नाशिक यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. या प्रकल्पामध्ये ६ एमएलडी (MLD) क्षमतेचे अत्याधुनिक MMBR तंत्रज्ञानाधारित मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्यात येणार असून, त्यासोबत Interception & Diversion या घटकांचाही समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे १२.४९ कोटी रुपये इतकी आहे.
शासनाच्या नव्या धोरणानुसार प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदी, नाले किंवा इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यासाठी आधुनिक STP उभारणे, मलजल वाहिनी जाळे विकसित करणे, नाले अडवून सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणे तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी बेसलाईन सर्वेक्षण, मृदा चाचणी, हायड्रॉलिक डिझाइन, BOQ, विद्युत व यांत्रिक नियोजन, संचालन व देखभाल आराखडा आणि पुनर्वापराची योजना तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धरणगाव शहरातील उघड्या नाल्यांमधून वाहणारे दूषित सांडपाणी, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि जलप्रदूषणात मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्याने, वृक्षसंवर्धन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, बांधकामे आणि इतर नागरी उपयोगांसाठी करता येणार असल्याने नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत शासनाने तयार केलेली नवी कार्यपद्धती राज्यातील शहरांच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. धरणगाव शहरासाठी या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून शासनाच्या नव्या धोरणामुळे या प्रकल्पाला थेट लाभ मिळाला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरण व्यवस्थापनात गुणात्मक बदल घडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



