Home Cities जळगाव असोदा उड्डाणपूल प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय ; दोषी ठेकेदारांना...

असोदा उड्डाणपूल प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय ; दोषी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश

0
8

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईचे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

असोदा उड्डाणपूल खचल्याची घटना घडल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेत नागरिकांशी संवाद साधत प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. या दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावर तातडीने दखल घेण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

खासदार स्मिता वाघ यांनी केलेल्या पाठपुराव्याची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याबरोबरच संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर प्रशासकीय स्तरावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याच बैठकीत खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दाही केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडला. आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक तसेच नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल अथवा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केला. या प्रस्तावांनाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार वाघ यांनी सांगितले.

या प्रस्तावांची अंमलबजावणी झाल्यास जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांचे प्रमाण घटण्यास तसेच नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत खासदार स्मिता उदय वाघ म्हणाल्या की, जळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound