Home Cities पाचोरा शासकीय कार्यक्रमांत विरोधी पक्षांना डावलल्याचा आरोप ; पाचोरा-भडगावमध्ये सर्वपक्षीय नेते आक्रमक

शासकीय कार्यक्रमांत विरोधी पक्षांना डावलल्याचा आरोप ; पाचोरा-भडगावमध्ये सर्वपक्षीय नेते आक्रमक

0
4

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय लाभार्थी कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक निमंत्रण दिले जात नसल्याचा गंभीर आरोप करत विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांना निवेदन सादर करून भविष्यात सर्व पक्षांना समान संधी व प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली.

पाचोरा-भडगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शासकीय लाभार्थी कार्यक्रमांमध्ये केवळ सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रित केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याउलट भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच रिपब्लिकन सेना यांसारख्या इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सातत्याने डावलले जात असल्याने नाराजी वाढत असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी म्हटले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या **’छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’**चाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी कोणत्याही विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला असून, शासनाचा मोठा निधी खर्च करून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सर्व लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अन्यथा अशा कार्यक्रमांचा मूळ उद्देशच अपूर्ण राहतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांना निवेदन देऊन भविष्यात कोणताही भेदभाव न करता सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना समान वागणूक द्यावी आणि शासकीय कार्यक्रमांना निमंत्रित करावे, अशी मागणी केली. प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घेऊन लोकशाही मूल्यांचे पालन करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, भाजप शहराध्यक्ष दीपक माने, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष परमेश्वर पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अनिल सांवत, रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दीपक राजपूत, भाजप भडगाव तालुकाध्यक्ष अनिल पाटील, विनोद नेरकर, युवा मोर्चाचे चेतन पाटील, योगेश ठाकूर, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष इरफान मणियार, ओबीसी सेल अध्यक्ष शरीफ शेख, सादिक मणियार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, शासकीय कार्यक्रमांमध्ये सर्व राजकीय पक्षांना समान प्रतिनिधित्व मिळावे, या मागणीसाठी पाचोरा-भडगावमध्ये विविध विचारसरणीचे पक्ष प्रथमच एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या निवेदनाची राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, विरोधकांनी केलेल्या आरोपांवर उपविभागीय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.


Protected Content

Play sound