Home Cities जळगाव SIR 2026 : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

SIR 2026 : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची प्रगती लक्षात घेऊन राज्य शासनाने मुदतवाढीची विनंती केली होती. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्राद्वारे सुधारित कार्यक्रम घोषित केला असून मतदार नोंदणी, दावे-हरकती आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटी देण्याचा कार्यक्रम ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या भेटीदरम्यान मतदारांची माहिती पडताळणी, आवश्यक नोंदी आणि पात्र मतदारांची माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्याचे कामही १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. या याद्यांमध्ये नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा वगळण्यासंदर्भातील सूचना नागरिकांना तपासता येणार आहेत.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची सुनावणी, नोटीस प्रक्रिया आणि त्यावरील निर्णय २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी या सुधारित वेळापत्रकाची माहिती दिली आहे.


Protected Content

Play sound