
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निम आणि शिरपूर तालुक्यातील मांजरोद या गावांना जोडणाऱ्या तापी नदीवरील प्रस्तावित पुलासाठी तब्बल १८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती गेल्या चार-पाच दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. मात्र, या निधी मंजुरीबाबत अधिकृत शासन आदेश, प्रशासकीय मान्यता किंवा खात्रीलायक पत्र उपलब्ध नसल्याने या दाव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी याबाबत अधिकृत खुलासा करावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

निम-मांजरोद तापी नदीवरील पुलाची मागणी परिसरातील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. हा पूल झाल्यास अमळनेर आणि शिरपूर हे दोन तालुके थेट जोडले जाण्यास मदत होणार असून, निम, मांजरोद तसेच परिसरातील अनेक गावांच्या दळणवळणाला मोठी चालना मिळू शकते. तसेच शिरपूर तालुक्यासह मध्य प्रदेशाकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीनेही या पुलाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
या पुलासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींसह खासदार स्मिता वाघ आणि विद्यमान अनेक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. परिसरातील नागरिकांनी स्थापन केलेली संघर्ष समितीदेखील गेल्या काही काळापासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला मंजुरी मिळावी, अशी नागरिकांची अनेक वर्षांची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत पुलासाठी १८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून वेगाने प्रसारित झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, त्यानंतर या निधी मंजुरीची अधिकृत कागदपत्रे अथवा शासन निर्णय उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने या माहितीच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही ठिकाणी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, निम-मांजरोद पुलाच्या कामाला केंद्र शासनाकडून अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच या प्रकल्पासाठी निधी मंजुरी, प्रशासकीय मान्यता किंवा शासन निर्णय झाल्याचे अधिकृत पत्रही सध्या उपलब्ध नसल्याने केवळ सोशल मीडियावरील माहितीकडे अधिकृत मंजुरी म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, पुलासाठी १८१ कोटी की १८३ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याच्या दाव्यांमध्येही संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमका किती निधी मंजूर झाला आहे, मंजुरी कोणत्या स्तरावर आहे, प्रशासकीय मान्यता झाली आहे का, तसेच केंद्र शासनाकडून प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे.
निम-मांजरोद पुलामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून, शिरपूर व अमळनेर तालुक्यांमधील दळणवळण अधिक सुलभ होण्याबरोबरच व्यापार, शेतीमालाची वाहतूक आणि स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ दोन गावांना जोडणारा पूल नसून दोन तालुक्यांच्या विकासाला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. नागरिकांची या प्रकल्पाबाबत सकारात्मक अपेक्षा कायम असून, पुलाच्या कामाबाबत अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच वस्तुनिष्ठ माहिती प्रसिद्ध करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरील अपुऱ्या किंवा अप्रमाणित माहितीकडून नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी अमळनेर व शिरपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन निधी मंजुरीची सद्यस्थिती स्पष्ट करावी, अशी रास्त मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.



