Home Cities जळगाव मनपा जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न? इंडियन रेड क्रॉसविरोधात ॲड. पियुष पाटील यांची तक्रार

मनपा जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न? इंडियन रेड क्रॉसविरोधात ॲड. पियुष पाटील यांची तक्रार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावरील संरक्षण भिंत रात्रीतून अनधिकृतरीत्या तोडल्याचा गंभीर आरोप इंडियन रेड क्रॉस सोसायटीवर करण्यात आला असून या प्रकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी महापौरांसह महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार देत या प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव शेजारी मनपा मालकीचा मोठा खुला भूखंड आरक्षित आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामादरम्यान वेस्ट मटेरियल टाकण्यासाठी याठिकाणी पाच फूट कंपाउंड वॉल तोडण्यात आली होती. मात्र बांधकाम पूर्णत्वाकडे जात असतानाही ती भिंत पुन्हा उभारण्यात आलेली नव्हती.

याच संधीचा फायदा घेत इंडियन रेड क्रॉस सोसायटीने रात्रीतून तब्बल १५ ते २० फूट कंपाउंड भिंत तोडून जेसीबीच्या सहाय्याने जागेचे सपाटीकरण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या जागेचा वापर पार्किंगसाठी सुरू करून संस्थेची वाहने उभी करण्यात आल्याचेही म्हटले गेले आहे. त्यामुळे मनपा मालकीच्या जागेवर अनधिकृत अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ॲड. पियुष पाटील यांनी यापूर्वीही या जागेबाबत इंडियन रेड क्रॉस सोसायटीकडून कथितपणे बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी रात्रीतून संस्थेच्या लोगोचे गेट बसविण्यात आले होते, मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आता पुन्हा भिंत तोडून जागेचा वापर सुरू केल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

या प्रकरणी महापौर, उपमहापौर, सभापती, आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली असून संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवर असा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना ॲड. पियुष पाटील यांनी कोट्यवधींच्या ठेवी असलेल्या मोठ्या संस्थेला मनपा मालकीच्या भूखंडाची आवश्यकता का भासावी, असा सवाल उपस्थित केला. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या संस्थेकडून सार्वजनिक मालमत्तेवर डोळा ठेवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

येत्या काळात इंडियन रेड क्रॉस सोसायटी संदर्भातील अन्य कथित गैरप्रकारही जनतेसमोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या वक्तव्यामुळे प्रकरणाला आणखी राजकीय आणि सामाजिक रंग चढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound