Home Cities यावल बाल संस्कार विद्या मंदिरात सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप

बाल संस्कार विद्या मंदिरात सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील बाल संस्कार विद्या मंदिर शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. गुरुवार, २३ मे रोजी संपन्न झालेल्या या निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या, तर शिक्षकांनीही पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

शाळेच्या परिसरात पार पडलेल्या या भावनिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष महेश वाणी उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अतुल गर्गे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा गाठताना आयोजित या कार्यक्रमात आनंद आणि विरह अशा दोन्ही भावना अनुभवायला मिळाल्या.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींसोबतचे क्षण शेअर केले. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेने दिलेल्या संस्कारांचे आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थिनींनी स्वतः रचलेल्या गीताचे. या गीताने उपस्थित गुरुजन आणि मान्यवरांची वाहवा मिळवली तसेच कार्यक्रमाला भावनिक उंची प्राप्त झाली.

यावेळी शिक्षक पंढरीनाथ महाले, राजेंद्र फालक, सविता गाजरे आणि अतुल पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील शिक्षणासाठी प्रेरणादायी विचार मांडले. यश मिळवण्यासाठी शिस्त, मेहनत आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कार्यक्रमात शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आदर्श विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. आदर्श विद्यार्थी म्हणून नाव लौकिक मिळवलेले साई एकनाथ कंखरे तसेच विद्यार्थिनींमधून सानवी आणि पंकज गडे यांचा शाळेतर्फे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि उत्साह निर्माण झाला.

निरोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रशांत महाजन यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय चौधरी, शिवशंकर सोळंकी, सुनील श्रावगी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

संपूर्ण कार्यक्रम भावनिक, आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला. शाळेच्या प्रांगणात रंगलेला हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी आठवणींचा ठेवा ठरला. शिक्षक-विद्यार्थी नात्यातील जिव्हाळा आणि संस्कारमूल्यांचा सुंदर आविष्कार या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.


Protected Content

Play sound