यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी विशेष जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तब्बल ११२ आदिवासी गावांची यासाठी निवड करण्यात आली असून, १३ ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान संबंधित गावांतील आदिवासी सेवा केंद्रांमध्ये ही जनसुनावणी होणार आहे.
भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार आयोजित या जनसुनावणीचा मुख्य उद्देश आदिवासी नागरिकांना शासकीय योजना, सेवा आणि सुविधांशी संबंधित अडचणी, प्रलंबित बाबी, तक्रारी व मागण्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या समस्यांची नोंद घेऊन संबंधित शासकीय यंत्रणेमार्फत त्यांचे तात्काळ अथवा नियमानुसार निराकरण करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

जनसुनावणीदरम्यान ग्राम अधिकारी, आदिवासी सेवा केंद्रातील स्वयंसेवक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी नोंदवून घेणार आहेत. त्यामुळे आदिवासी नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या न मारता संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या अडचणी मांडता येणार आहेत.
या उपक्रमासोबतच १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आदिवासी सेवा केंद्रांवर तिरंगा ध्वज फडकविणे तसेच ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनसुनावणीचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करून ते आदि प्रसारण पोर्टलवर अपलोड केले जाणार आहेत.
जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी ११२ गावांतील आदिवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने जनसुनावणीत सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



