Home क्राईम यावल तालुक्यात वीज साहित्य चोरीप्रकरणी चार आरोपी अटकेत 

यावल तालुक्यात वीज साहित्य चोरीप्रकरणी चार आरोपी अटकेत 

0
3


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबल, वीजतारा, स्टार्टर तसेच वीज कंपनीचे अन्य साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने यावल पोलिसांनी कारवाई केली आहे. २३ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांनी वीज साहित्य चोरीप्रकरणी चार संशयित आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात आणखी सात संशयितांचा सहभाग असल्याचे सांगितले जात असून ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या कारवाईमुळे तालुक्यातील यापूर्वीच्या वीज साहित्य चोरीच्या घटनांचाही तपास उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहनातून काही संशयित किनगाव बुद्रुक-मालोद रस्त्याने जात होते. यावेळी किनगाव येथील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सुपडू हमजान तडवी (वय ३३, रा. मालोद, हल्ली मुक्काम काजीपुरा, सावदा, ता. रावेर), करीम नशीर तडवी (वय २४, रा. तडवी वाडा, नायगाव, ता. यावल), अल्लाउद्दीन मजीद तडवी (वय २३, रा. नायगाव, ता. यावल) आणि आरिफ युनूस मन्यार (रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या तपासात आरोपी क्रमांक एक याने विविध कंपन्यांच्या अॅल्युमिनियम तारा तसेच अन्य साहित्य आरोपी क्रमांक चार याला विक्री केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान चोरीच्या साहित्याच्या खरेदी-विक्रीबाबतही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, दहिगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीच्या घटनांबाबतही यावल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दहिगाव येथील अरुण पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेतातील पिकांना पाणी देऊन ते घरी आले. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता ते पुन्हा शेतात गेले असता दहिगाव-चुंचाळा रस्त्यावरील त्यांच्या शेतातून सुप्रीम कंपनीची सहा एमएम मापाची तीन कोअर कॉपर केबल, अंदाजे १० फूट लांबीची आणि सुमारे १ हजार ६०० रुपये किमतीची, चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याचप्रमाणे दहिगाव येथील अनिल भागवत बडे यांच्या दहिगाव शिवारातील गट क्रमांक ३८४/२ मधून सुमारे १५ हजार रुपये किमतीची फिनोलेक्स कंपनीची चार एमएम मापाची १२० फूट कॉपर केबल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गौरव किशोर महाजन यांच्या बोराडे शिवारातील गट क्रमांक ७०/१ मधूनही फिनोलेक्स कंपनीची कॉपर केबल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. तसेच सुरेश विनायक राणे यांच्या दहिगाव शिवारातील गट क्रमांक ३७६ मधून फिनोलेक्स कंपनीची चार एमएम मापाची १२० फूट तीन कोअर कॉपर केबल चोरीला गेली. या केबलची किंमत सुमारे १५ हजार ६२५ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या सर्व तक्रारींच्या आधारे यावल पोलिसांनी भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या चोरीच्या घटनांचा आणि अटक करण्यात आलेल्या संशयितांचा परस्पर संबंध आहे का, तसेच यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक याच्याविरुद्ध यापूर्वी सावदा पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणात एकूण ११ जणांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत असून त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे, तर सात संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या कारवाईमुळे यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबल, वीजतारा, स्टार्टर आणि अन्य शेती उपयोगी वीज साहित्य चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून अटक आरोपींची चौकशी तसेच फरार संशयितांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक अमित तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. चोरीच्या घटनांमागील संपूर्ण साखळी आणि अन्य संशयितांचा सहभाग तपासातून स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound