Home Cities जळगाव आदर्श शिक्षक किरण पाटील यांना राज्यस्तरीय गुरुवर्य शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर

आदर्श शिक्षक किरण पाटील यांना राज्यस्तरीय गुरुवर्य शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर

0
8

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भगीरथ इंग्लिश स्कूलचे आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ग्लोबल गोल्ड टॅलेंट बूक ऑफ रेकॉर्ड, नवी मुंबई यांच्यातर्फे राज्यस्तरीय गुरुवर्य शिक्षणरत्न पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव झाला आहे.

किरण विठ्ठल पाटील हे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते ज्ञान न देता विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अध्यापनासोबतच साहित्याच्या माध्यमातून शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक तसेच वैचारिक प्रबोधन करण्याचे कार्यही ते सातत्याने करीत आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत ग्लोबल गोल्ड टॅलेंट बूक ऑफ रेकॉर्ड संस्थेने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली.

संस्थेच्या संचालिका मेघा श्रीराम महाजन यांनी निवडपत्र देऊन किरण पाटील यांना पुरस्कार जाहीर केला. यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, कारंजा-मानोरा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके, वाशिम-मंगरूळपीर मतदारसंघाचे आमदार श्यामभाऊ खोडे तसेच महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी आणि जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीचे माजी अध्यक्ष आ. एस. डी. भिरूड यांनी दूरध्वनीद्वारे तसेच अभिनंदन पत्राद्वारे किरण पाटील यांचे कौतुक केले.

किरण पाटील यांच्या गेल्या १८ वर्षांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत विविध स्तरांवरील तब्बल ४१ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे येथील आदर्श शिक्षक पुरस्कार, जळगाव जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील प्रथम क्रमांक, अमरावती येथील महाराष्ट्ररत्न पुरस्कार, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणेतर्फे उत्कृष्ट इंग्रजी मार्गदर्शक पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान, विद्यार्थीकेंद्री उपक्रम, साहित्यिक कार्य आणि सामाजिक व वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून किरण पाटील यांनी आदर्श शिक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यस्तरीय गुरुवर्य शिक्षणरत्न पुरस्कार २०२६ जाहीर झाल्याने त्यांच्या कार्याचा आणखी एक मानाचा गौरव झाला असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound