‘टास्क’च्या नावाखाली तरुणाला १२ लाखांहून अधिक गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, जळगावमध्ये सायबर गुन्हेगारांनी एका तरुणाला तब्बल १२ लाख १९ हजार १८३ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टेलीग्रामवर ‘सोप्या टास्क’ पूर्ण करण्याच्या नावाखाली सुरुवातीला नफा दाखवून, नंतर ‘चुकीच्या टास्क’चे कारण देत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी बुधवारी (२ जुलै) सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात व्हॉट्सॲप आणि टेलीग्रामवरील अज्ञात खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय भारत पाटील (वय ३१, रा. चहुत्रे, ता. पारोळा) हे या ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरले आहेत. १६ जून ते २२ जून २०२५ या कालावधीत ही घटना घडली. अक्षय पाटील यांच्या ‘अक्की पी’ या टेलीग्राम आयडीवर अनेक अज्ञात टेलीग्राम खातेधारक आणि एका व्हॉट्सॲप क्रमांकाच्या धारकाने संपर्क साधला. या सायबर गुन्हेगारांनी अक्षय पाटील यांना सुरुवातीला ‘गुगल कॉईन्स ग्रुप’ आणि त्यानंतर ‘गुगल व्हीआयपी ग्रुप’ या टेलीग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. या ग्रुपमध्ये त्यांना ऑनलाईन टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला काही टास्क पूर्ण केल्यावर अक्षय पाटील यांना थोडा नफाही मिळाला, ज्यामुळे त्यांचा विश्वास वाढला.

फसवणुकीचा डाव असा साधला…
विश्वास संपादन झाल्यानंतर, सायबर गुन्हेगारांनी आपला डाव साधण्यास सुरुवात केली. त्यांनी अक्षय पाटील यांना टास्क चुकीच्या पद्धतीने पूर्ण केल्याचे सांगून ‘रिकव्हरी’च्या नावाखाली वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. कोणताही परतावा न देता, अक्षय पाटील यांच्याकडून वेगवेगळ्या युपीआय आयडी आणि बँक खात्यांद्वारे तब्बल १२ लाख १९ हजार १८३ रुपये स्वीकारले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, अक्षय पाटील यांनी तात्काळ जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाईन आमिषांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.