जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातून दुचाकी चोरी प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत दुचाकी चोरट्यांना गुरूवारी ३ जुलै रोजी दुपारी २ वाजता पाचोरा शहरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहे. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी दोघांना भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत शेख इमरान शेख रफिक (वय २४, रा. ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव, मूळ रा. अंबिकानगर, शंभर फुटी रोड, धुळे) हा व त्याच्यासोबत एक इसम मोटारसायकली चोरी करत असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने पथक नेमले. पथकाने केलेल्या तपासानुसार, आरोपी पाचोरा शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पथकातील अंमलदारांनी आरोपी शेख इमरान शेख रफिक आणि त्याच्यासोबत असलेल्या शेख अकिल शेख शफिक (वय २७, रा. जलाली मोहल्ला, भडगाव) दोघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी भडगाव शहरात विजय हॉटेलच्या समोरून आणि खोल गल्ली भडगाव येथे सलूनच्या दुकानासमोरून अशा दोन दुचाकी चोरीची कबुली दिली आहे.
संशयित आरोपी शेख इमरान शेख रफिककडे अजून एक अॅक्टिवासारखी काळ्या रंगाची मोपेड मोटारसायकल असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, आरोपीवर धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी आणि मालमत्तेविरोधात गुन्हे दाखल असल्याचीही माहिती समोर आली आहे. पुढील योग्य त्या कारवाईसाठी आरोपींना भडगाव पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पो.हे.कॉ. संदीप पाटील, पो.ना. राहुल पाटील, पो.कॉ. जितेंद्र पाटील, पो.कॉ. भूषण पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.