जामनेरमध्ये ‘बहिणाबाई मॉल’चे साधना महाजन यांच्याहस्ते भूमिपूजन


जामनेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले असून, महिला बचत गटांसाठी उभारण्यात येणाऱ्या ‘बहिणाबाई मॉल’ इमारतीचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना व्यवसायवृद्धीसाठी नवी दिशा मिळणार आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माजी अभियंता जे. के. चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, प्रकल्प संचालक राजू लोखंडे (ग्रामीण विकास योजना – जळगाव), उपकार्यकारी अभियंता श्री. सुपे, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, उप अभियंता जी. व्ही. पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई आदी मान्यवर उपस्थित होते.

जामनेर शहरात उभारण्यात येणाऱ्या या ‘बहिणाबाई मॉल’साठी शासनाने एक कोटी रुपयांची तरतूद केली असून ही इमारत दोन मजली असणार आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बचत गटातील महिलांना त्यांची उत्पादने विक्रीसाठी सादर करता येतील. या स्टॉल्सद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे साधन मिळणार असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेचा थेट लाभ होईल. दुसऱ्या मजल्यावर बचत गटांसाठी स्वतंत्र कार्यालय असणार आहे, जे त्यांच्या प्रशासनिक कामकाजासाठी आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादकतेत वाढ करता येईल आणि आपले उत्पादन प्रभावीपणे प्रचारित करता येईल. महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना समाजात बळकट स्थान मिळवून देण्यासाठी ही इमारत एक प्रभावी व्यासपीठ ठरेल. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ ठिकाणी अशा महिला मॉल्सची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी एकूण २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.