वादळी वाऱ्याने केळीचे पीक जमीनदोस्त; नुकसान भरपाई देण्याची मागणी


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीचे पीक जमीनदोस्त झाल्याने यावल तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तहसीलदार, तलाठी आणि सर्कल यांच्याकडून अपेक्षित असलेल्या पाहणी आणि पंचनाम्यासाठी नावरे येथील शेतकरी हिरामण पाटील यांना अद्याप प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांनी न्याय मिळवण्याची मागणी केली आहे.

यावल तालुक्यातील नावरे आणि परिसरात २९ जून रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान झाले. यात नावरे येथील शेतकरी हिरामण रमेश पाटील यांच्या गट क्रमांक ५८ मधील २ हेक्टर बागायती क्षेत्रातील जवळजवळ ५ हजार केळीचे पीक जमीनदोस्त झाले. ऐन काढणीच्या वेळी आलेले पीक डोळ्यादेखत वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

या घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप कोणत्याही तलाठी किंवा सर्कल अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी करून पंचनामा केलेला नाही, अशी तक्रार शेतकरी हिरामण पाटील यांनी केली आहे. सध्या चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील पावसाळी अधिवेशनासाठी गेलेले असल्याने, अधिकारी वर्गाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यापूर्वीच आपत्ती व व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत सक्त सूचना दिलेल्या असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी कुटुंबांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शेतकरी हिरामण रमेश पाटील हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.