Home Cities यावल पंचायत समिती व झेडपी निवडणुका रखडल्या; ग्रामीण विकासकामे व नागरिकांच्या समस्या टांगणीवर

पंचायत समिती व झेडपी निवडणुका रखडल्या; ग्रामीण विकासकामे व नागरिकांच्या समस्या टांगणीवर

0
1

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील पाच वर्षांपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका विविध कारणांनी लांबणीवर पडत असल्याने ग्रामीण भागातील विकासकामांवर परिणाम होत असून नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहत असल्याची नाराजी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनावर प्रभावी लोकनियंत्रण राहिले नसल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

यावल पंचायत समितीसह विविध विभागातील अधिकारी कार्यालयात केवळ औपचारिक उपस्थिती लावून निघून जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, शासकीय योजनांचा लाभ तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार पंचायत समितीचे हेलपाटे मारावे लागत असून, अनेक कामे वेळेत होत नसल्याचे चित्र आहे.

ग्रामस्थांच्या मते, निवडून आलेले लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर पाठपुरावा करतात. मात्र निवडणुका रखडल्यामुळे हा दुवा तुटला असून विकासकामांनाही गती मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर करून घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


Protected Content

Play sound