


वरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरणगाव नगरपरिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या भोगावती नदी घाटाची स्वच्छता आणि सुशोभीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्वच्छता व सुशोभीकरण मोहिमेचा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष सौ. अरुणाताई इंगळे आणि मुख्याधिकारी राहुल भोये यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक नाना चौधरी, शबींनाबी इफ्तिखार मिर्झा, सौ. मनीषा नितीन माळी, निलेश खाचणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपक्रमादरम्यान भोगावती नदी घाटावरील कचऱ्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या वतीने केवळ स्वच्छताच केली जाणार नसून भोगावती नदी घाटाच्या परिसरात व्यापक वृक्षारोपण केले जाईल आणि या वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारीही नगरपरिषद पार पाडेल.
या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक रशीद नौरंगबादी, दीपक काळे, राहुल जाधव, गोकुळ भोई, महेंद्र मोरे, लड्डा पैलवान, सुनील तायडे, अण्णा इंगळे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता अभियानासोबतच या दिनाचे औचित्य साधून स्थानिक विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केक आणला होता. चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून अतिशय आनंदात आणि उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.



