
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा क्रमांक १३ शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही सभा होणार आहे. या बैठकीत विविध प्रशासकीय विषय, अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल, अग्निशमन विभागाचा आढावा तसेच शहरातील विविध प्रभागांमधील विकासकामांच्या प्रस्तावांवर चर्चा करून निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

सभेच्या विषयपत्रिकेतील पहिल्या विषयात २ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध विषयांशी संबंधित न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या साप्ताहिक अद्ययावत अहवालाची माहिती समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०५ (१) व १०६ (१) (अ) अन्वये लेखा परीक्षण विभागाकडील २ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपणाऱ्या अंतर्गत लेखा तपासणी कामाचा मुख्य लेखापरीक्षक विभागाचा अहवालही सभेत सादर केला जाणार आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २८९ अन्वये अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचा १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील अर्धवार्षिक आढावा अहवाल सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. यासोबतच अधिनियमातील कलम ७३ (ड) नुसार आयुक्तांनी केलेल्या संविदांची माहितीही स्थायी समितीच्या सदस्यांना देण्यात येणार आहे.
दरम्यान, शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रस्तावित असलेल्या विकासकामांच्या खर्चाला मंजुरी मिळण्याच्या दृष्टीने जोडपत्रातील विषयांकडे लक्ष लागले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ३ मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी २४ लाख ९९ हजार ९९५ रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील जय बजरंग सोसायटी ते माऊली अपार्टमेंटपर्यंत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि आरसीसी नाला तयार करण्यासाठी ९ लाख ९५ हजार ८४ रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३९ मधील संजय घायाळ ते फेडरेशन रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ९ लाख ५९ हजार २५९ रुपयांचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गतही विविध विकासकामांना मंजुरी देण्याचे प्रस्ताव आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १७ मधील गोमाई नदी ते देविदास कॉलनी ओपन स्पेसपर्यंत आरसीसी नाला तयार करण्यासाठी २३ लाख ६३ हजार ५१७ रुपयांचा प्रस्ताव आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील सर्व्हे क्रमांक ४३२ अ मधील ओपन स्पेस विकसित करण्यासाठी १ लाख ९९ हजार ३२४ रुपये खर्च अपेक्षित आहे.
याशिवाय प्रभाग क्रमांक ९ मधील हिराव शिव कॉलनी येथील ओपन स्पेसला चेनलिंग फेन्सिंग करण्यासाठी १ लाख १९ हजार २५८ रुपये, तर आरका नगर येथील ओपन स्पेसमध्ये रंगरंगोटी करून बाकडे बसविण्यासाठी १ लाख ८९ हजार ६८९ रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या कामांमुळे संबंधित भागातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
स्थायी समितीच्या या सभेत प्रशासकीय अहवालांसह विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर चर्चा होणार असल्याने कोणत्या कामांना मंजुरी मिळते, याकडे संबंधित प्रभागांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगरसचिव मनोज शर्मा यांनी सभेची अधिकृत सूचना आणि विषयपत्रिका प्रसिद्ध केली आहे.



