
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना मनोरंजनाचा अनोखा अनुभव देण्यासाठी जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व २’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी हा दोन दिवसीय महोत्सव रंगणार आहे. भाऊंचे उद्यान येथील ॲम्फी थिएटरमध्ये दररोज सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रम होणार असून, महोत्सवासाठी सर्व रसिकांना प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

या महोत्सवात बालविश्वाशी संबंधित दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मुलांना चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच कल्पनाशक्तीला चालना देणारे अनुभव मिळावेत, तसेच कुटुंबातील सदस्यांनी एकत्रितपणे आनंदाचे क्षण घालवावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळेच्या नियमित दिनक्रमात परतताना मुलांसाठी हा महोत्सव आनंददायी पर्वणी ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय ‘जादूश्री’ पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध युवा जादूगार चेतनकुमार यांचे जादूचे प्रयोग. त्यांच्या हातचलाखीचे आणि विस्मयकारक जादूच्या प्रयोगांचे सादरीकरण बालप्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. बालचित्रपटांसोबतच जादूचे प्रयोग पाहण्याची संधी मिळणार असल्याने महोत्सवात मनोरंजनाची दुहेरी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पालक आणि पाल्यांना एकत्र बसून निवांतपणे मनोरंजनाचा आनंद घेण्याची संधी कमी मिळते. अनेकदा मुलांच्या आवडी-निवडी आणि त्यांच्या भावविश्वाला समजून घेण्यासाठी पालकांना पुरेसा वेळ देता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन पालकांनी मुलांसोबत चित्रपट पाहावेत, त्यांच्याबरोबर आनंदाचे क्षण अनुभवावेत आणि स्वतःच्या बालपणाच्या आठवणींनाही उजाळा द्यावा, या सकारात्मक विचारातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २८ नोव्हेंबर आणि रविवार, २९ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी सायंकाळी ५.३० वाजता भाऊंचे उद्यान येथील ॲम्फी थिएटरमध्ये महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. जळगाव शहरातील विद्यार्थ्यांनी, बालचमूंनी, पालकांनी तसेच चित्रपटप्रेमींनी या दोन दिवसीय उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि बालचित्रपटांसह जादूच्या प्रयोगांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



