Home Cities अमळनेर अमळनेर येथे दिव्यांगांना सहाय्यक साहित्याचे वितरण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भव्य...

अमळनेर येथे दिव्यांगांना सहाय्यक साहित्याचे वितरण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भव्य सेवा उपक्रम

0
5


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमळनेर येथे ‘सामाजिक अधिकारिता शिबिर’ अत्यंत उत्साहात पार पडले. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ व ‘एडीआयपी’ (ADIP) योजनेच्या माध्यमातून अमळनेर परिसरातील दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या विशेष शिबिरादरम्यान गरजू लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक सायकली, व्हीलचेअर, आधुनिक श्रवणयंत्रे, अंध बांधवांसाठी काठ्या आणि इतर दैनंदिन उपयोगाचे सहाय्यक साहित्य वितरित करण्यात आले. या साहित्यामुळे दिव्यांगांची गतिशीलता व श्रवणक्षमता वाढून त्यांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, कोणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी हे साहित्य अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थितांनी दिव्यांग बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, गरजा व अपेक्षा जाणून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी अमळनेर येथे हे भव्य शिबिर साकार होऊ शकले, असे मत मान्यवरांनी आपल्या भाषणात मांडले.

या सोहळ्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, भाजप मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, माजी सभापती प्रफुल्ल पवार, भाजप जिल्हा सरचिटणीस महेंद्र पाटील, किसान मोर्चा अध्यक्ष निवास मोरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, माजी जि. प. सदस्या मीनाताई पाटील, संदीप पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, नगरसेवक परदेशी सर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) कानपूर, जिल्हा प्रशासन जळगाव आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound