Home Cities अमळनेर BHMS-CCMP नोंदणीला IMA अमळनेरचा कडाडून विरोध ; रुग्णहितासाठी प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

BHMS-CCMP नोंदणीला IMA अमळनेरचा कडाडून विरोध ; रुग्णहितासाठी प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

0
4

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथे इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) शाखेच्या पुढाकाराने डॉक्टर मोठ्या संख्येने एकत्र येत प्रस्तावित BHMS-CCMP नोंदणी प्रक्रियेविरोधात तीव्र भूमिका घेतली. महाराष्ट्र राज्य IMA, सेंट्रल MARD, ASMI तसेच विविध स्पेशालिस्ट संघटनांच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत IMA अमळनेरने प्रांताधिकारी मयूर भांगळे यांना निवेदन सादर केले. शासनाने रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

IMA अमळनेरच्या निवेदनात प्रस्तावित BHMS-CCMP नोंदणी प्रक्रियेसंदर्भात अद्याप स्पष्ट कायदेशीर, शैक्षणिक आणि नियामक चौकट उपलब्ध नसल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञ, वैद्यकीय परिषद, कायदेतज्ज्ञ आणि शासन यांच्यात व्यापक स्तरावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. आधुनिक वैद्यकशास्त्र हे अनेक वर्षांचे शिक्षण, सखोल प्रशिक्षण, इंटर्नशिप, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी यावर आधारित असल्याचे IMA ने अधोरेखित केले. रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आवश्यक वैज्ञानिक ज्ञान, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कायदेशीर जबाबदारी असणे अत्यावश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय हा वैज्ञानिक पुरावे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विद्यमान कायदेशीर चौकट यांचा विचार करूनच घेतला गेला पाहिजे. अन्यथा रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याबरोबरच राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वासही डळमळीत होण्याची शक्यता असल्याची चिंता IMA ने व्यक्त केली.

राज्यव्यापी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा अखंड सुरू राहतील, तसेच गंभीर रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी ग्वाहीही IMA अमळनेर शाखेने दिली. त्यामुळे आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला बसणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले. या निवेदनावर IMA अमळनेरचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन, खजिनदार डॉ. मयुरी जोशी यांच्यासह डॉ. बी. एस. पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. संदीप जोशी, डॉ. भूषण पाटील, डॉ. रविंद्र कुलकर्णी, डॉ. राहुल मुठे, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. अक्षय कुलकर्णी, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. किरण बडगुजर, डॉ. एन. डी. ओसवाल, डॉ. अनिल वाणी, डॉ. सुमित सूर्यवंशी आणि इतर अनेक डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या असून मोठ्या संख्येने IMA सदस्य या आंदोलनात सहभागी झाले.


Protected Content

Play sound