अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजहितासाठी निर्भीडपणे लेखणी चालवत जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे कळमसरे (ता. अमळनेर) येथील सुपुत्र तथा दैनिक पोलीस टुडेचे संस्थापक व मुख्य संपादक रत्नदीप कमलसिंह सिसोदिया यांना प्रतिष्ठेच्या ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिग्विजय फाउंडेशन, धुळे यांच्या वतीने आयोजित ‘जय सन्मान सोहळा – जीवन गौरव व समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभात’ उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्रकारितेतील सामाजिक बांधिलकी आणि लोकहिताच्या कार्याचा या माध्यमातून गौरव करण्यात आला.
धुळे येथे बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रत्नदीप सिसोदिया यांनी आपल्या निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, प्रशासनातील अनियमितता उघडकीस आणणे, सामाजिक समस्यांना वाचा फोडणे आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देणे, अशा विविध माध्यमांतून त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत दिग्विजय फाउंडेशनने त्यांची ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी निवड केली.
पत्रकारिता हे केवळ घडामोडींचे वृत्तांकन करण्याचे माध्यम नसून समाजातील वंचित, उपेक्षित आणि अन्यायग्रस्त घटकांचा आवाज बनण्याचे प्रभावी साधन आहे. या विचारातून सिसोदिया यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकणे, या त्यांच्या कार्याचा पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान झाला आहे.
या सोहळ्यात ॲड. अमरदीपसिंह गिरासे यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर प्रा. डॉ. जसपालसिंह सिसोदिया यांनी कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती, पुरस्कारार्थींचा सन्मान आणि प्रेरणादायी विचारांच्या देवाणघेवाणीमुळे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कळमसरे गावासह अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या सन्मानामुळे रत्नदीप सिसोदिया यांच्यावर पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



