ब्रेकिंग : भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडले; नातेवाईकांचा खूनाचा आरोप


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |

जळगाव ते आसोदा रोडवर गुरुवारी ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडलेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका भरधाव चारचाकी वाहनाने मागून येऊन दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मात्र, हा अपघात पूर्वनियोजित असून, जुन्या वादातून मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय ३८, रा. भादली) या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नातेवाईकांनी मोठा आक्रोश करत आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय-३८ रा. भादली ता. जळगाव) हा तरुण आपल्या आई, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. जळगाव शहरातील गांधी मार्केट येथे कापड दुकान चालवून तो आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे मोहम्मद खाटीक हा गुरुवारी ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घरून निघून जळगाव शहराकडे दुचाकीने एकटाच येत होता. त्यावेळी मागून येणारी चारचाकी कारने मोहम्मद याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोहम्मद हा गंभीर रित्या जखमी झाला, त्यामुळे त्यांच्या दुचाकीच्या मागे येणारे मित्र जावेद पटेल आणि शाहरुख पटेल यांनी त्याला जखमी अवस्थेत उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मदत घोषित केले.

ही घटना घडल्यानंतर मागे येणारा शाहरुख पटेल याने गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, चारचाकी वाहनात दोन जण बसलेले होते आणि त्यापैकी दीपक धनगर नावाच्या व्यक्तीने पूर्वनियोजित कट रचून मोहम्मदच्या दुचाकीला धडक दिली. एवढेच नाही तर, जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या मोहम्मदच्या डोके आणि छातीवरून तीच कार पुढे-मागे करत चाक नेऊन त्याला गंभीर जखमी केले, तसेच त्यांना (शाहरुखला) जीवे मारण्याची धमकी दिली, असेही शाहरुखने सांगितले.

यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तरुणांच्या मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. जोपर्यंत संशयित आरोपींला अटक करून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा खाटीक समुदायाने घेतला होता. यावेळी समाज बांधवांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी खाटीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हरून नदी आणि बिट्टू सलार यांनी देखील नातेवाईकांचे सांत्वन करत शांत केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संबंधित कारचालकासह एकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.