गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ‘वन महोत्सव सप्ताह’ उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एनएसएस युनिटमार्फत ‘वन महोत्सव सप्ताह २०२५’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ‘झाडे लावा, पृथ्वी वाचवा’ या संकल्पनेवर आधारित हा सप्ताह (१ ते ७ जुलै) राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला आहे.

या सप्ताहाचा एक भाग म्हणून, १ जुलै रोजी महाविद्यालयात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा महत्त्वाचा संदेश समाजात पोहोचवण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस युनिटच्या पुढाकाराने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ अशी संकल्पना राबवत पर्यावरण रक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. या उपक्रमामध्ये विविध प्रकारची औषधी झाडे, आकर्षक फुलझाडे आणि दाट सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

या वृक्षारोपण मोहिमेमागे केवळ परिसर सुशोभीकरण करणे हाच उद्देश नव्हता, तर विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी अधिक जागरूकता आणि जाणीव निर्माण करणे हाही महत्त्वाचा हेतू होता. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने राबवलेला हा उपक्रम पर्यावरणासाठीच्या योगदानाचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे.