Home क्राईम चाळीसगावातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४० हजारांची रोकड...

चाळीसगावातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४० हजारांची रोकड जप्त

0
20

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील घरफोडी करून ८० हजार रुपये चोरण्याच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी नदीमशहा लियाकतशहा याला चाळीसगाव शहरातील घाट रोड, विष्णू पार्क परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास पुढे सरकला आहे.

.३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान घराच्या मागील बाजूच्या भिंतीतील पत्र्याचा भाग काढून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेली ८० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याची तक्रार ३ ऑगस्ट रोजी पोलिसांकडे दाखल करण्यात आली. या चोरीप्रकरणी फिर्यादीने नदीमशहा लियाकतशहा व त्याच्यासोबतच्या इतर व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता

या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाबाबत मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू केला. पथकाकडून संशयित आरोपी नदीमशहा लियाकतशहा याचा परिसरात शोध घेतला जात होता.

दरम्यान, पोलिसांना एका विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी चाळीसगाव शहरातील घाट रोड, विष्णू पार्क परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून नदीमशहा लियाकतशहा याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याच्याकडून मिळालेली ४० हजार रुपयांची रोकड ही चोरीच्या रकमेपैकी असल्याचेही त्याने कबूल केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

त्यानंतर पोलिसांनी ४० हजार रुपयांची रोकड जप्त केली असून आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. चोरीतील उर्वरित रकमेबाबत तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील, सागर पाटील आणि भुषण शेलार यांचा समावेश होता. पथकाने केलेल्या या कारवाईचे पोलिसांकडून कौतुक करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound