मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कुंभमेळा प्राधिकरणाने या बोधचिन्हासाठी देशव्यापी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला देश-विदेशातून मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यामध्ये ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचाही सहभाग होता. या स्पर्धेत पुणे येथील सुमित काटे यांनी प्रथम क्रमांक पटकावत तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह मिळविले. नोएडा येथील मयांक नायक यांनी द्वितीय क्रमांक मिळवत दोन लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले, तर पंढरपूर येथील पीयूष पिंपळनेरकर यांनी तृतीय क्रमांक मिळवत एक लाख रुपयांचा धनादेश स्वीकारला. विजेत्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

या स्पर्धेतील प्रवेशिकांचे परीक्षण प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या नामवंत डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित अंतिम निवड करण्यात आली. या समितीचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकातून कुंभमेळ्याच्या आयोजनाची माहिती देताना बोधचिन्हाच्या संकल्पनेमागील धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ स्पष्ट केला. हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोलावर आधारित असून भगवान शंकराच्या त्रिशूळाद्वारे आध्यात्मिक ऊर्जा दर्शविण्यात आली आहे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती, काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदीला शिवलिंगाच्या रूपात साकारण्यात आले असून, कुंभमेळ्यातील पवित्र स्नान परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, विविध आखाड्यांचे साधू-संत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित साधू-संतांचे स्वागत करत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे वैश्विक दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



