Home Cities जळगाव डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयातील ‘आरोहण २०२६’चा जल्लोषात समारोप

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयातील ‘आरोहण २०२६’चा जल्लोषात समारोप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोहण २०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रॉम नाईट आणि डीजे नाईट अशा विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध कला आणि क्रीडा प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या प्रतिभेचा आविष्कार सादर केला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ‘आरोहण २०२६’चे प्रतीकात्मक फलक प्रदर्शित करत महोत्सवाच्या प्रारंभाची घोषणा करण्यात आली. उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांनी जल्लोषपूर्ण वातावरणात सहभाग घेतला.

महोत्सवादरम्यान ‘कुरुक्षेत्र’ या क्रीडा विभागांतर्गत कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल यांसारख्या विविध सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खेळातील कौशल्य, टीमवर्क आणि क्रीडाभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धांमध्ये रंगत आणली. महोत्सवात एकूण आठ ते दहा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

११ मे रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘प्रॉम नाईट’चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर १२ मे रोजी डीजे नाईट आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाचा रंगतदार समारोप झाला. गायन, वादन, नृत्य आणि मनोरंजनात्मक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश या महोत्सवामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

समारोप कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज शर्मा, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणविर, डॉ. पियुष वाघ, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. विजय बाविस्कर यांच्यासह प्राध्यापकवर्ग, अध्यापन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंददायी आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound