मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी अवैध दरवाढ, अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक आणि बसस्थानकांवरील अस्वच्छतेच्या तक्रारींची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले. यामध्ये १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्याचा निर्णय विशेष ठरला आहे.
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. अनेक कंपन्या अनधिकृत मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून बुकिंग करत असल्याने प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देत प्रताप सरनाईक यांनी “प्रवाशांची लूट कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा दिला.

या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आले. या समितीत सुराज्य अभियानचे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे आणि सुनील हनवट यांचा समावेश असून समिती खासगी बस भाडेवाढीवर नियंत्रण, अवैध बुकिंग ॲप्सना आळा आणि प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना याबाबत सविस्तर अहवाल सादर करणार आहे. अहवालानंतर पुढील बैठकीत आवश्यक निर्णय घेऊन उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर आणि अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर उपस्थित होते. राज्यातील बसस्थानकांवरील संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक बसस्थानकावर प्रवासी सुविधांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याबरोबरच, बदललेल्या गावांच्या नावांचा आणि व्याकरणदृष्ट्या शुद्ध मराठी भाषेचा वापर सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने परिपत्रक जारी करावे, असे निर्देशही देण्यात आले.
दरम्यान, एसटी बसस्थानकांच्या स्वच्छतेबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. प्रवाशांना उत्तम आणि स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
याशिवाय एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. मोफत प्रवास पासचा कालावधी आता १२ महिन्यांचा करण्यात आला आहे. आयुष्यभर सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा हा सन्मान असल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. संघर्ष महाराष्ट्र एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे प्रताप सरनाईक यांचा सत्कारही करण्यात आला.
राज्य शासनाच्या या निर्णयांमुळे खासगी बस प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून एसटी बसस्थानकांवरील सुविधा आणि स्वच्छतेतही सुधारणा होण्याची शक्यता आहे.



