प्रवासी रिक्षा चोरणारी टोळीचा पर्दाफाश ; ५ रिक्षा जप्त, ४ आरोपी गजाआड !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातून वाढत्या प्रवासी रिक्षा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. नाशिक आणि चाळीसगावातून चोरी केलेल्या दोन रिक्षांसह एकूण ५ प्रवासी रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणात ४ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर आणि अपर पोलीस अधीक्षक (जळगाव) अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते.

नाशिक-चाळीसगावमधून रिक्षा चोरणारे जेरबंद
गोपनीय माहितीनुसार, पोहेकॉ अक्रम याकूब शेख यांना पिंप्राळा हुडको येथील सादिक अली सैय्यद अली (वय ४०) आणि त्याचा विधी संघर्षग्रस्त (अल्पवयीन) पुतण्या यांनी नाशिक व चाळीसगावातून दोन प्रवासी रिक्षा चोरल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथक तयार करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी ७-८ दिवसांपूर्वी नाशिक रोड (नाशिक) येथून एक आणि चाळीसगाव शहरातून एक अशा दोन रिक्षा चोरल्याची कबुली दिली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात या चोरीबाबत गुन्हे दाखल आहेत. आरोपी सादिक अली सैय्यद अली याच्या पुतण्या यांनी या दोन्ही रिक्षा हजर केल्या. एकूण १ लाख १० हजार रूपये किंमतीच्या दोन प्रवासी रिक्षा जप्त करून सादिक अलीला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अधिक चौकशीत आणखी ३ रिक्षा व आरोपी निष्पन्न
आरोपी सादिक अली सैय्यद अली याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील अन्य तीन व्यक्तींकडेही चोरीच्या रिक्षा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, १) नरेंद्र भीमराव अहिरे (वय ३०, रा. न्यू दूध फेडरेशन पिंप्राळा हुडको), २) सुनील गोकुळ भालेराव (वय २७, रा. बौद्ध वसाहत पिंप्राळा हुडको), आणि ३) शब्बीर सुपडू पठाण (वय ३४, रा. न्यू खाना नगर पिंप्राळा हुडको) या तिघांनाही त्यांच्या ताब्यात असलेल्या रिक्षांसह स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले.

त्यांच्या ताब्यातील रिक्षांची खात्री केली असता, त्यांचे इंजिन नंबर, चेसिस नंबर आणि आरटीओ नंबर वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले. तसेच, त्यांच्याकडे रिक्षांच्या मालकी हक्काची कोणतीही मूळ कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्या ताब्यातून एकूण १ हजार २० हजार रुपये किमतीच्या ३ प्रवासी रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या तिन्ही आरोपींविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोउपनि सोपान गोरे, सपोअतुल बंजारा, पोहेकॉ सुनील दामोदरे, अक्रम याकूब शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, पोकॉ किशोर पाटील, रवींद्र कापडणे आणि चापोकॉ महेश सोमवंशी यांनी केली आहे.