व्याघ्र अधिवासक्षेत्र निवासिनी डोलारखेडा येथील मरीमातेचा आज यात्रोत्सव

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा जंगलातील प्राचीन जागृत देवस्थान तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मरीमातेचा यात्रोत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

नवसाला पावणारी माय मरीमाय अशी ख्याती असलेल्या मरीतातेच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांची रीघ लागते.भक्तांची इच्छित मनोकामना मातेने पुर्ण करावी किंवा एखाद्या संकटातुन सुटका व्हावी यासाठी भाविकांकडुन मोठ्या श्रध्देने नवस मानला जातो. भक्तांची मनोकामना पुर्ती होऊन भक्तांकडुन मोठ्या उत्साहाने नवस फेडला जातो. दरम्यान वर्षभरात माघ,श्रावण, मार्गशीर्ष व नवरात्रात मरीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यात माघ महिन्यातील दर मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यामध्ये जिल्ह्यासह बुलढाणा,अकोला,अमरावती तसेच मध्य प्रदेशातुन मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.

नवस मानल्याप्रमाणे बोकडांचा बळी देण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. इच्छापूर्ती झालेल्या भाविकांकडुन दरवर्षी शेकडोच्या संख्येने नवस फेडले जातात.दरम्यान काही भाविकांकडुन वरण,बट्टी वांग्याची भाजी,शेवभाजी यासारख्या शाकाहारी जेवणाचेही भंडारे आयोजिले जातात.

विविध वनसंपदेने नटलेल्या तसेच पट्टेदार वाघांचे अधिवासक्षेत्र असलेल्या जंगलात निसर्गरम्य स्थळी मरीमातेचे मंदिर आहे. देवस्थान प्राचीन असले तरी सन ८० च्या दशकात जळगाव येथील बेर्डे नामक भाविकांनी नव्याने मंदीर बांधकाम केले आहे. मंदीर परीसरात इतर वन्यप्राण्यांप्रमाणे वाघांचा अधिवास असल्याने मरीमातेला व्याघ्रअधिवासक्षेत्र निवासिनीही म्हटले जाते. जळगाव एसपी कार्यालयातील अजय बावस्कर यांनी पाण्याची सोय म्हणुन ट्युबवेल,मोटारपंप व पाणी साठवण्यासाठी टाकी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातुन मंदिरापर्यत विजेची व्यवस्था झालेली आहे. मंदिराची देखभाल पुजाअर्चा डोलारखेडा येथील बिसन पाटील यांनी मरणोत्तर अखंडीतपणे चालु ठेवली.त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र मारोती पाटील मातेच्या पुजेअर्चेसह मंदिराची देखभाल करीत आहे.

परीसरात सोयी-सुविधा उपलब्ध होण्याची आवश्यकता

मंदिर परीसर वनविभागाच्या अख्यातरीत्या येत असल्याने वनविभागीय प्रशासकिय धोरणामुळे परवानगी अभावी या जागृत तीर्थक्षेत्राचा विकास रखडला आहे. मात्र भक्तांची वाढती संख्या पहाता तसेच शेकडोच्या संख्येने होणारे नवसाचे कार्यक्रम यामुळे येथे पायाभुत सुविधांची गरज आहे.रस्त्याचे डांबरीकरण,सभामंडप,यासह सुशोभीकरण होण्याची गरज याठिकाणी आहे.जेणेकरुन भक्तांची होणारी गैरसोय टाळता येईल. तालुक्यातील चारठाणा, हरताळा, माळेगाव येथील वनहद्दीतील तीर्थक्षेत्रांप्रमाणे येथीलही विकास व्हावा अशी भाविकांची अपेक्षा आहे. रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत लक्ष द्यावे. मंदिर परिसरात पायाभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, जेणेकरुन भाविकांची गैरसोय टाळता येईल, अशी प्रतिक्रिया परीसरातील जनतेची आहे.

Protected Content