अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या १६ दिवसीय ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली. कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये एकूण ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान ब्लाऊज, ड्रेस तसेच विविध वस्त्रांवर आकर्षक आरी वर्क करण्याचे कौशल्य महिलांना शिकविण्यात आले. बेसिकपासून ॲडव्हान्स स्तरापर्यंत विविध प्रकारच्या डिझाइन्स, आधुनिक तंत्र आणि व्यावसायिक पद्धतीने काम करण्याचे सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून जयश्री अनिल पाटील, कांचन शहा, आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील तसेच कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते सहभागी महिलांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ. भारती पाटील यांनी महिलांनी आपल्या कौशल्याच्या बळावर आर्थिक स्वावलंबन मिळवून उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केले. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा कौशल्याधारित प्रशिक्षणांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख पाहुण्या जयश्री अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अशा प्रशिक्षणांमुळे महिलांच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग अधिक मजबूत होत असून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत आपल्या कौशल्याचे व्यवसायात रूपांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशिक्षिका नयना राजपूत यांनी प्रशिक्षणार्थींना बेसिक ते ॲडव्हान्स आरी वर्कचे प्रत्यक्ष आणि सखोल प्रशिक्षण दिले. कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद यांनी महिलांनी तयार केलेल्या विविध आरी वर्क नमुन्यांची पाहणी करून त्यांच्या कलाकौशल्याचे कौतुक केले आणि भविष्यात स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मुरलीधर बिरारी, समन्वयक उर्जिता शिसोदे तसेच संस्थेचे कार्यकर्ते भावेश मराठे यांनी विशेष परिश्रम घेतले.



