अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रस्ते अपघातांमध्ये जखमींना ‘सुवर्णक्षणात’ तातडीची मदत मिळून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘झिरो फॅटॅलिटी कॉन्सेप्ट’ उपक्रमाला लायन्स क्लब, अमळनेरने मोलाचे सहकार्य केले आहे. क्लबच्या वतीने अमळनेर शहर पोलीस ठाण्यास दोन फोल्डेबल स्ट्रेचर आणि दोन फर्स्ट एड किट बॉक्स भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे अपघातग्रस्तांना घटनास्थळी त्वरित मदत करणे अधिक प्रभावी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम पार पडला. लायन्स क्लबकडून देण्यात आलेले स्ट्रेचर आणि प्रथमोपचार साहित्य शहर पोलीस ठाण्याच्या दोन्ही शासकीय वाहनांमध्ये ठेवण्यात आले असून, अपघातस्थळी जखमींना सुरक्षितरीत्या हलविणे आणि तातडीचे प्रथमोपचार देणे यामुळे अधिक सुलभ होणार आहे. शहर व परिसरात होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये जखमींना मदत करताना स्ट्रेचर आणि प्रथमोपचार साहित्याची कमतरता भासत असल्याची बाब पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या सूचनेची तात्काळ दखल घेत सामाजिक बांधिलकी जपत क्लबने आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळणे हेच खरे समाजकार्य असल्याचे सांगितले. लायन्स क्लबने दिलेल्या साहित्यामुळे अपघातातील जखमींना ‘सुवर्णक्षणात’ मदत करण्याची क्षमता अधिक वाढणार असून, अनेकांचे प्राण वाचविण्यास याचा हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. सामाजिक सेवेसोबत पर्यावरण संरक्षणाचाही संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, प्रोजेक्ट चेअरमन सुनील चौधरी, अभिषेक (राज) जैन, रजनीश वरलानी आणि प्रदीप पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, डॉ. मिलिंद नवसारीकर, महेंद्र पाटील, एस. डी. भरुचा, जितेंद्र जैन, प्रशांत सिंघवी, शेखर धनगर, डॉ. रवींद्र जैन, रवींद्र कॉलरा, प्रकाश शहा, कुमारपाल कोठारी, प्रकाश जैन, चंद्रकांत महाजन, दिनेश मणियार, दिलीप गांधी, विनोद अग्रवाल, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, शरद काकलीज, पोलीस हवालदार हितेश बेहरे, सिद्धार्थ शिसोदे, भटुसिंग तोमर, प्रमोद पाटील, योगेश बागुल यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते म्हणाले, “अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी लायन्स क्लबने अमळनेर पोलिसांना स्ट्रेचर व फर्स्ट एड किट उपलब्ध करून दिली आहे. जीव वाचविण्यासाठी केलेली ही मदत म्हणजे खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा आहे. पोलीस ठाण्यात उपलब्ध झालेल्या या साहित्यामुळे अपघातग्रस्तांना त्वरित मदत करणे अधिक सुलभ होणार असून, समाजासाठी लायन्स क्लबने उचललेले हे पाऊल निश्चितच अनुकरणीय आहे.”



